कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी आमदार रमेश जारकीहोळी यांनी जोरदार कसरतीला सुरुवात केली असून आज त्यांनी बेंगलोर येथे मुख्यमंत्री बसावराज बोम्मई यांची भेट घेऊन चर्चा केली. दिल्ली दौऱ्यावर जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बाहेर पडताना प्रसिद्धी माध्यमांच्या बाबतीत त्यांनी आपली नाराजी प्रकट केली.
मी कांहीही बोलणार नाही. मी काही सांगितले तर तुम्ही त्याच्या उलट छापता प्रसिद्धीमाध्यमांनी योग्य भूमिका घेतली असती तर हे सर्व झालं नसतं, असे आमदार रमेश जारकीहोळी म्हणाले. तसेच उपस्थित पत्रकारांनी कांही प्रश्न विचारण्यापूर्वी ते तेथून निघून गेले.
पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याने जारकीहोळी मंत्रीपद मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यासाठी दिल्लीच्या वाऱ्या करून त्यांनी भाजप वरिष्ठांच्या गाठी भेटी घेताना देवालाही साकडे घालण्यात सुरुवात केली आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच केदारनाथ तीर्थक्षेत्राला भेट दिली होती. यावेळी देव आपल्याला तारेल आणि मंत्रीपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे.
या बरोबरच आमदार रमेश जारकीहोळी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कर्नाटक प्रांत संचालक अरविंद देशपांडे यांचीही भेट घेतली आहे.
त्यानंतर आता आर. टी. नगर येथे मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन त्यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांची भेट घेऊन चर्चा केल्यामुळे त्यांच्या मंत्रिपद पदाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.