हा चालला शेलारमामा समितीचा…….! उन्हानेही म्हटलं ही धग कसली जी मलाही सोसवत नाही………! वय वर्षे किती? थोडे थोडके नव्हे तर 70 पेक्षा जास्त,केस एक दोन नव्हे तर पूर्णपणे पिकलेले,शरीरही तसेच पूर्ण थकलेले मात्र मनात एकच एल्गार…. जय महाराष्ट्र.
सीमावासीयांचा आजचा मोर्चा आणि त्यात नेतृत्वाला सर्वात पुढे असलेले शेलारमामा रामा शिंदोळकर यांना पाहिले की वरून ताळपणाऱ्या उन्हानेही म्हटले की, अरे ही धग कसली जी मलाही सोसवत नाही………!आणि कर्नाटक सरकारला याच मराठी अस्मितेच्या आगीने आज पुरते नमविले.
नेणत्याला खूळ लावील असं जाणतं व्यक्तिमत्व आज समितीचं नेतृत्व करीत होतं.घोषणा येत होत्या हा आवाज कुणाचा? समितीचा……! आणि हा समितीचा आवाज जगभर दाखविणारे रामा शिंदोळकर आपल्या सर्व शारीरिक व्यथा वेदना विसरून पुढे पुढे चालले होते.
रामा शिंदोळकरआजही प्रत्येक लढ्याचा साक्षीदार बनत आलेले आहेत.जगभर विचारलं जातं की सीमाप्रश्नाचा लढा कसा चालतो? त्याचं उत्तर आज मोर्चात मिळत होतं.
मरणदाराची सीमारेषा ओलांडून एकदा परत आलेला माणूस आज परत तीच उमेद,हिम्मत आणि बळ घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.
राजकर्ते राजकारण करत राहतात पण तळागाळात उतरलेलं मराठीचं प्रेम अशा आबालवृद्धातून दिसून येतं.जगभरात भाषेसाठी लढला गेलेला हा एकमेव लढा यामुळेच चर्चेत राहतो.भर बाराच्या तळपत्या उन्हात तरुणही लाजतील अशा हिम्मतीनं रामा शिंदोळकर चालत होते.भगव्याचा महासागर उसळत होता आणिकर्नाटकी प्रशासन या सागरा समोर नमले होते.
काठी उगारण्याची आणि बॅरिकेड्स लावण्याची हिम्मत इथेच लयाला गेली. तसे केले तर या शेलारमामा मधील तानाजी मालुसरे कधी जागृत होईल आणि सिंहगड चा लढा चालू होईल याची खैर नाही असे म्हणत महासागराला फक्त पाहात राहण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता.छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकली.मूठभर मावळ्यांना घेऊन एल्गार केले.
त्या एल्गाराची जाणीव करून देणारा आजचा मोर्चा अर्थात मराठी अस्मितेचं भगवं वादळ बेळगावात घुमून गेलं.
बघताय काय सामील व्हा ची आरोळी द्यावीच लागली नाही. कारण प्रत्येक माणूस सामील झालाच होता.बेळगावची मराठी माती धन्य पावत होती. हा मोर्चा नव्हता हा मराठी माणसाचा हुंकार होता.
मराठी माणसाचा स्फुल्लिंग चेतविलं जात होतं. आणि यामुळेच ऊनही म्हणत होतंअरे ही आग कसली आहे ?ही धग कसली आहे?मलाही सोसवत नाही.
कर्नाटक प्रशासनाने आता ओळखावं कायद्याचा बडगा दाखवून ही लाट थांबणार नाही. हा एल्गार थांबणार नाही. दुसऱ्याच्या हक्काचं तुम्हाला लुटता येणार नाही आणि बेळगावचा मराठी माणूस हटविता येणार नाही. येथील
मराठी माती प्रत्येक कण आणि कण भरून आहे. बेळगावची
ओळखच मराठी आहे. यामुळे यापुढे कोणताही मराठी माणूस अन्याय सहन करणार नाही हेच या मोर्चाने दाखवून दिले.