दसऱ्याच्या तोंडावर सर्वपित्री अमावस्याला पाऊस आला की तो नऊ दिवस पडतो असे म्हणतात. सध्या तसेच वातावरण आहे. अमावस्येच्या दिवशी दुपारी आणि सायंकाळी परतीच्या पावसाने दाणादाण उडवून दिली. त्यामुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाल्याचे चित्र आहे .जाताना निवांत जा नुकसान करू नकोस. असेच पर्जन्यराजाला सांगण्याची वेळ बळीराजावर आली आहे .
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी इतका पाऊस झाला की शेतीचे मोठे नुकसान झाले. अखेर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला .
नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या वायव्य भारतातून माघारी परतण्याच्या कालावधीत नुकसानीची स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण देशाला पाऊस देणारा मान्सून आजपासून परतीच्या प्रवासावर निघण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. सर्वसाधारण वेळेपेक्षा काहीशा उशिराने संपूर्ण देशात पोहोचलेल्या मान्सूनच्या परतीचा मुहूर्तही लांबला आहे.
मान्सूनचे आगमन आणि परतीच्या वेळी ठरवण्यासाठी गेल्या वर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार 17 सप्टेंबर ही मान्सूनचा राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित करण्यात आली आहे.
या पूर्वी राजस्थानातून माघारीची तारीख 1 सप्टेंबर ठेवण्यात आली होती. मान्सूनची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख 15 ऑक्टोबर आहे.
या वर्षीचा मान्सून चा विचार करता अनियमित आणि नियमित वेळेच्या दोन दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये दाखल झाला. मान्सून केरळमध्ये तीन जून रोजी दाखल झाला. केरळात दाखल होताच मान्सून एक्स्प्रेसचा प्रवास सुसाट गतीने सुरू झाला. अरबी समुद्रातून वेगानं प्रवास करत मान्सून दोनच दिवसात महाराष्ट्रात पाच जूनला पोहोचला. मान्सूनने यंदा पाच दिवसातच (10 जून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. अरबी समुद्रात आलेले शाहीन चक्रीवादळ ओमान कडे गेल्यानंतर भारताच्या काही भागातून मोसमी वारे माघारी परतण्यासाठी अनुकूल हवामान झाले. आज दिनांक सहा पासून मान्सून परतीच्या प्रवासावर निघणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
*आज या भागात पाऊस*
हवामान विभागानुसार दिलेल्या माहितीनुसार बेळगाव व खानापुर तालुक्यात आज चांगला पाऊस झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून दिली आहे. या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.