सीमाभागातील जनतेवर होणारे अन्याय अत्याचार आणि ठोकशाहीला प्रखर विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने सालाबाद प्रमाणे जपली आहे .
केंद्र सरकारने 865 खेड्यांचा सीमाभाग कर्नाटकात डांबला याचा निषेध दरवर्षी एक नोव्हेंबरला काळा दिन पाळून केला जातो. याच पार्श्वभूमीवर या वर्षीही एक नोव्हेंबरला काळा दिन पाळला जाणार आहे. तर त्यापूर्वी प्रशासनाला आपली भूमिका समजावून सांगण्यासाठी आज 25 ऑक्टोबरला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
वास्तविक पाहता आज सीमावासीयांचे आज रस्त्यावरचे आंदोलन होणार आहे.मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने त्या संदर्भातील एक पत्र बेळगावच्या पोलीस आयुक्तांना दिले असून या निषेध कार्यक्रमाला परवानगी देण्याची मागणी केली होती.कोणत्याही परिस्थितीत मोर्चा करणारच असा निर्धार व्यक्त झाला आहे.
धर्मवीर संभाजी चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात करून कॉलेज रोड चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात येणार आहे .
मोर्चाची जय्यत तयारी
बेळगाव सह सीमाभागातील मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे. प्रत्येक ठिकाणी बॅनर लावून, विभागवार बैठका घेऊन तसेच एकत्रितपणे उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त करून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी समिती नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले बॅनर गावागावात वाटण्यात आले आहेत. बेळगाव शहर आणि उपनगरी भागाच्या बरोबरीनेच बेळगावचा ग्रामीण भाग, बेळगाव तालुक्यातील विविध भागातून महिला व युवक कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. त्याच पद्धतीने खानापूर तालुक्यातील जनता ही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहे.
युवा समिती आणि महिला मोर्चाच्या वतीने खानापुर तालुक्यातील जास्तीत जास्त सदस्य या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत.प्रशासनाने कितीही दबाव आणला तरी मोर्चा यशस्वी करणारच असा निर्धार गावागावात व्यक्त होत असून कार्यकर्ते बेळगावकडे कूच करत आहेत.