मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक आय. एम. गुरव यांनी गोवा विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. मराठीतील जेष्ठ संशोधक
“वि. बा. प्रभुदेसाई यांचे मराठीतील संशोधन कार्य : एक चिकीत्सात्मक अभ्यास” या विषयांतर्गत त्यांनी प्राचीन काव्य, पोर्तुगीज राजवट व बेळगाव परिसरातील स्थलांतरे, जेजुईत पंथीयांनी भारतीय भाषांचे केलेले अध्ययन, सतराव्या शतकातील मराठी व कोंकणी बोलीभाषा, रोमन लिपीतील सांकेतिकता, पोर्तुगीजांचे धर्मप्रसाराचे कार्य, ताम्रपट, शिलालेख, लिप्यंतर शास्त्र, बृहन्महाराष्ट्र चळवळ, पाठ चिकित्साशास्त्र यासारख्या मराठीतील क्लिष्ट मानल्या जाणाऱ्या विषयांचा व्यासंगपूर्ण आणि चिकित्सकपणे अभ्यास सदर प्रबंधात मांडला आहे.
डॉ. गुरव यांचे मूळ गाव सावरगाळी ता. खानापूर असून तिथल्या प्राथमिक मराठी शाळेचे ते विद्यार्थी. त्यांचे पुढील शिक्षण प्राथमिक मराठी मुलांची शाळा चिरमुरकर गल्ली खानापूर, तर माध्यमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण मराठा मंडळ खानापुर या संस्थेतून पूर्ण केले.
अतिशय कठीण हालाखीची म्हणावी अशी घरची आर्थिक स्थिती आणि शिक्षणाला आप्तस्वकीयांच्या कडून झालेला विरोध अशा खडतर परिस्थितीत खचून न जाता शिक्षणाच्या ओढीमुळे त्यांनी खानापूर येथील खादी ग्रामोद्योग अर्थात सी. व्ही. पी. आय. मध्ये अकरावी ते पदवी पर्यंतचे शिक्षण सेक्युरिटी गार्ड( वाचमन) ची रात्रपाळीची नोकरी करत पूर्ण केले. आपल्यावर ओढवलेल्या कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी मराठीत एम. ए., एम. फिल, के- सेट आणि आता पीएच. डी. या सर्वोच्च पदवी पर्यंत मजल गाठली आहे.
यासाठी त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांचे हे यश तालुक्यातील नवतरुणांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांना पीएच. डी. करिता गोवा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. सुनिता उम्रसकर या मार्गदर्शक म्हणून लाभल्या. तसेच कै. उदयसिंह दत्ताजीराव सरदेसाई, कै. प्रा. वसंत अ. कुलकर्णी, डॉ. अमृत यार्दी, प्रा. सुनीता राक्षे. डॉ. दुर्गेश माजिक यांचे मार्गदर्शन व सहाय्य लाभले.