कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे मराठी भाषिकांचा येत्या 25 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा आणि काळा दिन फेरीला परवानगी दिली जाणार नाही असे पोलीस प्रशासनाकडून आज स्पष्ट करण्यात आले. तथापि मोर्चा काढून काळा दिन पाळला जाणारच असे समिती नेत्याने ठामपणे स्पष्ट केले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 25 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चा आणि काळा दिन फेरी यासंदर्भात आज सकाळी खडेबाजार पोलीस उपविभाग येथे समितीचे नेतेमंडळी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक या पार पडली. या बैठकीत खडेबाजार उपविभागाचे पोलीस एसीपी चंद्रप्पा आणि मार्केट विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमणी यांनी कोरोनाच्या संकटामुळे येत्या 25 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिकांचा जो मोर्चा काढण्यात येणार आहे, त्याला परवानगी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्याचप्रमाणे 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित सायकल फेरी व इतर कार्यक्रमांवर बंदी असेल असेही सांगितले. यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी गेल्या कांही दिवसात ईद-ए-मिलाद मिरवणूक, इस्कॉन मिरवणूक आदी कार्यक्रमांवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचा संदर्भ दिला. तसेच मोर्चा व काळा दिनाच्या कार्यक्रमावर आमची बंदी असणार आहे. तेंव्हा पुनर्विचार करून मोर्चा व काळा दिनाचा कार्यक्रम मागे घ्या व पोलिस प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन एसीपी चंद्रप्पा व कट्टीमणी यांनी केले.
तेंव्हा आपल्या मागण्या आणि त्याची पूर्तता होणे किती आवश्यक आहे याची माहिती समितीच्या नेतेमंडळींनी पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर 25 रोजी भव्य मोर्चा काढला जाईल आणि एक नोव्हेंबर काळा दिनही पाळला जाईल, यात बदल होणार नाही, असे देखील ठामपणे सांगितले.
याप्रसंगी माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, विकास कलघटगी, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण -पाटील, ॲड. जी. एम. पाटील आदी समितीची नेतेमंडळी उपस्थित होती. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनातर्फे एसीपी चंद्रप्पा व एसीपी सदाशिव कट्टीमणी यांच्यासह बेळगाव ग्रामीण एसीपी गुडाजी, खडेबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निंबाळकर, कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धर्मट्टी, उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे हे पोलिस अधिकारी बैठकीला हजर होते.