कॅन्टोन्मेंट हद्दीतील चंदन थिएटर शेजारील खुल्या जागेमध्ये व्यापारी गाळे उभारल्यास त्या जागेचा चांगला वापर होण्याबरोबरच कॅन्टोन्मेंटला चांगला महसूल मिळेल. त्याचप्रमाणे फोर्ट रोड येथील कॅन्टोन्मेंटचे जुने कॉम्प्लेक्स पाडून स्मार्ट सिटी अंतर्गत नवी इमारत उभारल्यास महसुलात आणखी भर पडेल, अशी सूचना बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओंना केली.
कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभागृहामध्ये काल सोमवारी आमदार ॲड. अनिल बेनके आणि बोर्डाचे सीईओ आनंद के. यांची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कॅम्प येथील चंदन थिएटर शेजारी बोर्डाच्या कार्यालय आवार भिंतीपर्यंत असणारी खुली जागा सध्या कोणत्याही वापरत नाही.
या ठिकाणी खाऊ कट्ट्याच्या धर्तीवर व्यापारी गाळे उभारल्यास कॅन्टोन्मेंटलाच महसूल मिळणार आहे. कॅन्टोनमेंटने परवानगी दिल्यास स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती आमदार बेनके यांनी यावेळी दिली. यावर बोर्डाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सीईओंनी दिले.
याव्यतिरिक्त कॅन्टोन्मेंटचे फोर्ट रोडवर असलेले जुने कॉम्प्लेक्स पाडवून स्मार्ट सिटीतून नवीन बहुमजली इमारत उभारण्याची परवानगी द्यावी. ही इमारत झाल्यास महसूल आणखी वाढेल. नवीन इमारत उभारण्यासाठी या ठिकाणी असलेल्या गाळेधारकांना हटवावे लागेल.
ती जबाबदारी तुम्ही घ्या, असेही आमदार बेनके यांनी सुचवले. त्यानंतर सैनिक स्मारक उद्यानाविषयी बैठकीत चर्चा झाली. बैठकीस अभियंता सतीश मण्णूरकर, कार्यालयीन अधिक्षक एम. वाय. ताळूकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार ॲड. अनिल बेनके आणि सीईओ आनंद के. यांनी चंदन थिएटर शेजारील खुल्या जागेची पाहणी देखील केली.