राकसकोप (ता. जि. बेळगाव) येथे प्रतिवर्षाप्रमाणे खास दसरोत्सवानिमित्त गावातील नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक असलेल्या व गावातील हौशी युवकांतर्फे शनिवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता ‘एक दिवस गावासाठी’ हा आगळा-वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
खेड्यातील कृषी, आरोग्य व शिक्षण या बाबतीत जनजागृती करणे हा ‘एक दिवस गावासाठी’ या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो. राकसकोप गावातील राजा शिवछत्रपती चौकातील समाज भवनाच्या प्रांगणात शनिवारी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शिवानंद महाविद्यालय कागवाडचे मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक अलगोंडी यांचे ‘बदलते ग्रामीण जीवन’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानानंतर येळ्ळूर येथील गायक भुजंग पाटील व आनंद पाटील यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. तसेच गावातील प्राथमिक माध्यमिक उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसह हौशी कलाकारांची संस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमाचा मुख्य भाग हा शैक्षणिक वर्ष 2019 -20 आणि 2020 -21 या सालातील गावातील गुणवत्ताप्राप्त गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करणे हा आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.