बेळगाव जिल्ह्यातील अग्रगण्य मराठा को -ऑप. बँकेतर्फे वयाची 55 वर्षे पूर्ण झालेल्या आणि भागधारक होऊन 20 वर्षे झालेल्या सर्व ज्येष्ठ सभासदांना वृद्धकालीन सुविधा म्हणून 2,500 रुपये देण्याचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
मराठा बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक रवींद्र पाटील उपस्थित होते. प्रारंभी माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर यांनी बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला.
संचालक दीपक दळवी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी रवींद्र पाटील यांचे स्वागत करण्याबरोबरच शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.
सहाय्यक निबंधक रविंद्र पाटील यांनी मराठा बँकेच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करून बँकेच्या डिजिटल सेवेबद्दल आणि ज्येष्ठ सभासदांना देत असलेल्या वृद्धकालीन सुविधेबद्दल प्रशंसोद्गार काढले.
याप्रसंगी बँकेचे संचालक एल. एस. होनगेकर, बी. एस. पाटील, शेखर हंडे, सुनील अष्टेकर, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, शिवाजी नाईक, रेणू किल्लेकर, महाव्यवस्थापक गजानन हिशोबकर आदींसह बँकेचे ज्येष्ठ सभासद उपस्थित होते. व्हा. चेअरमन नीना काकतकर यांनी सर्वांचे आभार मानले.