कर्नाटक सरकारने सहावी ते दहावी पर्यंतची शाळा ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन भरवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अर्धवेळ शाळा ऑफलाईन स्वरुपात भरण्यात येत होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील सहावी ते दहावी पर्यंतच्या शाळा पूर्ण क्षमतेने भरण्याचा आदेश कर्नाटकाच्या शिक्षण खात्याने दिला आहे .
उद्या अर्थात सोमवार दिनांक चार पासून शाळा पूर्णवेळ भरणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी साडेचार पर्यंत शाळांचा कालावधी असणार आहे. कोरोनाची भीती असल्यामुळे माध्यान्ह आहार शाळांमध्ये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत येताना घरातूनच आपल्या जेवणाचा डबा आणि पिण्यासाठी पाणी आणावे असे आवाहन कर्नाटक सरकार आणि शिक्षण खात्याने केले आहे .
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स ची बैठक घेण्यात आली.
आरोग्यमंत्री तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली असून 23 ऑगस्ट पासून नववी आणि दहावीच्या वर्ग सुरू करण्यात आले होते तर 6 सप्टेंबरपासून सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला होता.
मात्र हे वर्ग अर्धवेळ भरवण्यात येत होते. आता यापुढील काळात सहावी ते दहावी वर्ग पूर्ण वेळ भरविण्यात येणार आहेत. असा निर्णय घेण्यात आला आहे.