भाजपचा कोणीही आमदार काँग्रेसमध्ये येईल असे बोललेला नाही.असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणतात.
आता असे खोटे बोलणाऱ्यांना कुठल्या वेड्यांच्या इस्पितळात ठेवायचे? कनकपूरमधल्या की, सतीश जारकीहोळी यांच्या मतदार संघातल्या? त्यांनी कुठे बेड पाहिजे ते सांगावे अशा शब्दांत मंत्री ईश्वरप्पा यांनी खिल्ली उडवली.
कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा म्हणाले, शिवकुमार भाजपचे ४० आमदार काँग्रेसमध्ये येणार असल्याचे सांगतात, पण ४० काय ४ आमदारदेखील जाणार नाहीत.
निवडणूक आल्या की, काँग्रेस नेते हादरून जातात. देशात कुठेही निवडणूक झाली की, काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत आहे. अशा अनामत रक्कम गमावणाऱ्या काँग्रेस पक्षात जायला भाजप आमदार वेडे आहेत का? असा सवाल ईश्वरप्पा यांनी केला.
ईश्वरप्पा पुढे म्हणाले, भाजपचे आमदार सिंह आहेत, विक्रीची वस्तू नव्हेत. एक एमएलसीही काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता नाही. देशातील कोणत्याही निवडणुकीत भाजपच विजयी होत आहे. तर काँग्रेसचे नामोनिशाण मिटत आहे. काँग्रेसच्या २३ निष्ठावान नेत्यांना कार्यकारिणी सभा बोलवण्याची मागणी करण्याची वेळ आली आहे. काँग्रेसचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे एकही भाजप आमदार या पक्षात जाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘पंतप्रधान मोदी चिल्लर माणूस आहे’ असे विधान करणारे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरही ईश्वरप्पा यांनी निशाणा साधला. आज संपूर्ण जगात मोदींचे कौतुक होत आहे. खर्गे यांचे म्हणणे कोण ऐकतो का? तोंडाला येईल ते बरळणाऱ्या खर्गेंच्या विधानामुळे मी नाराज आहे. खर्गे यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.