केंद्र सरकारचे निर्देश आणि राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार कोरोना साथीच्या आजाराचा धोका असलेल्या 9 देशातील नागरिकांना कर्नाटकात प्रवेशासाठी कोरोना चांचणी अनिवार्य अर्थात सक्तीची असल्याचा आदेश कर्नाटक सरकारने जारी केला आहे. शिवाय त्यांना 7 दिवस काॅरन्टाईनमध्ये रहावे लागणार आहे.
कर्नाटक राज्य सरकारने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशियस, न्यूझीलंड आणि झिंबाब्वे यांच्यासह युरोपीय देशातील प्रवाशांनी कर्नाटकात येताना अतिरिक्त पावले उचलली पाहिजेत. या देशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस काॅरन्टाईन राहावे लागेल. त्यानंतर आठव्या दिवशी कोरोना तपासणी करून घ्यावी लागेल. सर्व प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी एअर सुविधा पोर्टलवर स्वघोषित पत्रासह 72 तासापेक्षा जुना नसलेला आरटी -पीसीआर निगेटिव्ह अहवाल अपलोड करणे सक्तीचे असणार आहे. तसेच विमान कंपनी अथवा संबंधित एजन्सीना याबाबतची खातरजमा प्रवाशांकडून करून घ्यावी लागेल असे आदेशात नमूद आहे. प्रवासादरम्यान विमानातील हवाई कर्मचाऱ्यांनी प्रवाशांकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन होईल, याकडे लक्ष द्यावे. विमान प्रवासादरम्यान जर एखाद्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्याचे अथवा तिचे तात्काळ विलगीकरण केले जावे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) मान्यताप्राप्त कोरोना लसीच्या बाबतीत ज्या देशांशी भारताची परस्पर सामंजस्य व स्वीकृतीची व्यवस्था आहे, अशा देशातून आलेल्या प्रवाशांचे जर संपूर्ण लसीकरण झालेले असेल तर त्यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी असेल. मात्र आगमनानंतर 14 दिवस त्यांना स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे लागेल. जर प्रवाशाचे अर्धवट लसीकरण झालेले असेल किंवा झालेलेच नसेल तर त्यांनी विविध क्रम घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये आगमनाच्या दिवशी कोरोना चांचणीसाठी नमुना देणे महत्त्वाचे असेल. त्यानंतरच त्यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी मिळेल. तसेच घरामध्ये त्यांना 7 दिवस होऊन काॅरन्टाईन रहावे लागणार आहे आणि भारतातील आगमनाच्या आठव्या दिवशी पुनश्च एकदा कोरोना चांचणी करून घ्यावे लागेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
अतिरिक्त खबरदारी घेण्याबरोबरच आगमनानंतर ज्या देशातील प्रवाशांसाठी कोरोना चांचणी सक्तीचे असेल ते देश पुढील प्रमाणे आहेत.
युनायटेड किंगडम, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशियस, न्यूझीलंड आणि झिंबाब्वे यांच्यासह युरोपीय देश. त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) मान्यताप्राप्त कोरोना लसीच्या बाबतीत ज्या देशांशी भारताची परस्पर सामंजस्य व स्वीकृतीची व्यवस्था आहे ते देश पुढील प्रमाणे आहेत युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, नेपाळ, बेलारुस, लेबनॉन, अर्मेनिया, युक्रेन, बेल्जियम, हंगेरी आणि सर्बिया.