बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अर्थात बुडाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अंदाजपत्रकावर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता विविध माध्यमातून चालू आर्थिक वर्षात बुडाला 438 कोटी 86 लाख रुपये मिळणार आहेत. बैठकीत कणबर्गी निवासी योजनेचा 210 कोटी रुपयांचा आराखडा देखील तयार करण्यात आला.
चालू आर्थिक वर्षातील सहा महिने लोटल्यानंतर बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे (बुडा) 1 कोटी 48 लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर झाले आहे. नूतन अध्यक्ष संजय बेळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या सोमवारी झालेल्या बैठकीत बुडाचे 438 कोटी 86 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मांडण्यात आले. या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता बुडाची आर्थिक कोंडी दूर झाली आहे विविध माध्यमातून यंदाच्या वर्षात बुडाला 438 कोटी 86 लाख रुपये मिळणार आहेत, तर आर्थिक वर्षात बुडाकडून 437 कोटी 73 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
चालू आर्थिक वर्षात बुडाकडे 1 कोटी 48 लाख रुपयांचा निधी शिल्लक राहील असा अंदाज आहे. सदर बैठकीत कणबर्गी निवास योजनेबाबत ही चर्चा झाली या निवासी योजनेसाठी 210 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो आराखडा मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी बेंगलोरला पाठविण्यात आला असल्याची माहिती बैठकीत अध्यक्ष व सदस्यांना देण्यात आली.
कणबर्गी निवासी योजनेच्या हद्द निश्चितीचे काम गेल्या आठवड्यात सुरू झाले आहे. आता तेथे सपाटीकरण व अन्य कामे सुरू करायची आहेत. त्या कामांना बैठकीत मंजुरी घेण्यात आली. कणबर्गी निवासी योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची सूचनाही बैठकीत देण्यात आली.
बेळगाव उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकास कामांबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी दक्षिण मतदार संघातील कांही उद्यानांच्या विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला. उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासाचा प्रस्ताव आमदार ॲड. अनिल बेनके यांनी मांडला. या प्रस्तावांबाबत बैठकीत चर्चा होऊन संबंधित दोन्ही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून बुडाच्या बैठकाच न झाल्यामुळे खाजगी ले-आऊटच्या मंजुरीची प्रक्रिया रखडली होती.