डोक्याला घालण्याची टोपडीची (कुंची) दोरी गळ्याभोवती आवळली गेल्यामुळे अवघ्या सहा दिवसांच्या स्त्री जातीच्या एका अर्भकाचा श्वास गुदमरून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नुकतीच घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय 21) या महिलेला बाळंतपणासाठी नेहरूनगर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने गेल्या सोमवारी 4 ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रियेद्वारे स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला होता.
सहा दिवसांच्या त्या अर्भकाला टोपडी (कुंची) घालून झोपविण्यात येत होते. मात्र दुर्दैवाने त्या टोपडीची दोरी गळ्याला आवळली गेल्याने त्या अर्भकाचा रविवारी गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर मातेसह मृत अर्भकाला घरी नेण्यात आले.
दरम्यान, एपीएमसी पोलिसांना काल सोमवारी या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ अधिक तपास करीत आहेत. अवघ्या सहा दिवसांच्या अजान अर्भकाला टोपडीमुळे जीव गमवावा लागल्यामुळे संबंधित हॉस्पिटलसह सुळगा -हिंडलगा गावात हळहळ व्यक्त होत आहे.