बेळगाव शहरात काल घडलेल्या एका घटनेने खळबळ माजवली आहे. प्रत्येकानेच चिंतन करण्यासारखा हा प्रकार घडला आहे .शाळा सुरू झाली शाळेला जा असे आई-वडिलांनी सांगितले म्हणून एका 13 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या करणे हे समाजाच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक ठरत आहे.
दीड ते दोन वर्षे लॉकडाऊन मुळे शाळा बंद यामुळे अतिशय मोकळेपणा मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेला जाणे किती जिवावर येत आहे हेच या घटनेवरून दिसून येते. खरेतर दुर्दैवी प्रकार आहे. 90 टक्के विद्यार्थी कधी एकदा शाळा सुरु होते आणि पुन्हा शाळेत जाऊन अभ्यास करायला मिळतो याकडे लक्ष ठेवून आहेत.
आपले मित्र,शिक्षक यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. काही वर्ग भरायला सुरुवात झाल्यापासून असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात चैतन्य निर्माण झाले आहे. ज्यांचे वर्ग अजून सुरू झाले नाहीत ते डोळे लावून बसले आहेत. मात्र दहा ते पंधरा टक्के विद्यार्थ्यांना पुन्हा शाळा नकोच आहे.
असंख्य विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील देवाकडे शाळा पुन्हा सुरू होऊ नये , कोरोनाच जाऊ नये या प्रकारच्या विचित्र प्रार्थना केल्याच्या घटना पाहायला मिळतात. त्यामुळे कोरोनाने बालमनावर आणि शाळेसंदर्भातील त्यांच्या बाल निर्णयांवर कितपत परिणाम केलेला आहे हेच दिसून येत आहे .
काल बेळगावात जी आत्महत्या घडली त्या घटनेकडे गांभीर्याने पाहायला हवे. मानसोपचार तज्ञ आणि बालरोग तज्ञ यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मुलांची मानसिक स्थिती ओळखून त्यावर वेळीच उपचार करण्याची गरज आहे.
समुपदेशन आणि शाळेचे महत्त्व समजावून सांगितल्यास त्यांच्यात नक्कीच फरक पडू शकतो, मात्र यासाठी गांभीर्याने विचार करण्याची आणि वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.
शाळा हे बालकाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. कोरोना आल्यामुळे ऑनलाइन शिक्षणासारख्या पर्याय निवडण्यात आला. त्यामुळे घरात काही तास अभ्यास आणि त्यानंतर पूर्णपणे मोकळेपणा, खेळण्याची, मोबाईल मध्ये गुंतण्याची मोकळीक मुलांना आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन वेगळ्याच पातळीवर आले आहे .
आता पुन्हा शाळा सुरू होणार शिक्षकांच्या समोर बसून अभ्यास करावा लागणार या संदर्भातील विचार करण्याची प्रवृत्ती वेगळ्या प्रकारची बनत आहे. काही विद्यार्थी खुश होण्यापेक्षा दडपण जास्त घेत आहेत. मात्र यात पालकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन त्यांच्यातील मानसिक बदलांवर योग्य उपचार करण्याची गरज निर्माण होते. अशा प्रकारची मुले आढळल्यास त्यांना मार बडव, आरडा ओरड करण्यापेक्षा त्यांच्या मनातील नव्याने निर्माण झालेली चुकीची भावना दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा असतात. त्यांना आकार द्यावा तशी त्यांची मूर्ती घडत असते.
त्या पार्श्वभूमीवर त त्या संघर्षमय जीवनात निर्माण होणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीत बदलत असलेली मानसिक स्थिती सुधारण्यासाठी सकारात्मकरीत्या विचार करून पालकांनी पुढे यायला हवे .
कालची घटना दुर्देवी ठरली .त्या बालकाच्या पालकांना सोसावे लागलेले त्रास मोठे आहेत .मात्र असे त्रास अनेक पालकांच्या पदरी येऊ नयेत या दृष्टीने आताच विचार करण्याची गरज आहे. फॅमिली डॉक्टर, मानसोपचार तज्ञ तसेच शेजारपाजारच्या जाणकार व्यक्तीने अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधित बालकांच्या मनातील गंड किंवा दडपण वेळीच बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.