शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीचे पर्यंतचे वर्ग पूर्वपदावर आल्यामुळे तयार माध्यान्ह आहार वितरणास सुरुवात झाली असून लवकरच विद्यार्थ्यांना क्षीरभाग्य योजनेअंतर्गत दुधाचे वाटप केले जाणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण खात्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या 23 ऑगस्टपासून नववी ते दहावी तर 6 सप्टेंबरपासून इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते.
आता गेल्या सोमवारपासून इयत्ता पहिली ते पाचवीच्या शाळा सुरळीत देखील सुरू झाल्याने पालक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दसरा सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्याने इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना तयार माध्यान्ह आहार देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन नोव्हेंबर पासून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
त्यानंतर आता विद्यार्थ्यांना दूध वाटप करण्यासाठी शिक्षण खात्याने पावले उचलण्यास सुरुवात केली असून दूध वाटपाचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल असे समजते.
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे अनेक दिवस शाळा बंद राहिल्याने तयार दूध पावडर मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिल्याने केएमएफने सरकारकडे दूध पावडर खरेदी करण्याची मागणी केली होती.
तसेच कांही महिन्यापूर्वी शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना घरपोच दूध पावडर देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत दूध उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन वेळा दुधाचे वाटप केले जाईल अशी माहिती उपलब्ध झाली आहे.