बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगावच्या रस्त्यावर सोमवारी जय महाराष्ट्र चा गजर घुमला .पोलिसांची अडवणूक त्यानंतर ठिय्या आंदोलन आणि मोर्चा काढणार असा निर्धार व्यक्त झाल्यानंतर सोमवारी सीमावासीयांच्या भव्य आणि दिव्य अशा महा मोर्चाला सुरुवात झाली.
सकाळी अकरा पासूनच बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौकामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कार्यकर्ते आणि मराठी भाषेत मोठ्या संख्येने जमू लागले होते. वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांनी बेळगावसह संपूर्ण सीमाभाग आणि मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी लावून धरली होती. पोलिसांनी अडवणूक करून हा मोर्चा रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र मोर्चा काढू दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही .
असा पवित्रा घेऊन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच महिला कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे तब्बल अर्धा तास अडवणूक केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली असून मोर्चा आता हळुवारपणे पुढे सरकु लागला.
कॉलेज रोड मार्गे कित्तूर राणी चन्नम्मा चौकात जाऊन येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा निघाला व जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
पोलिसांकडून मराठी भाषिकांच्या मोर्चाची अडवणूक
भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे सर्व अधिकार मराठी भाषिकांना देण्यात यावेत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला भव्य मोर्चा पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण पुढे करून सुमारे अर्धा तास धर्मवीर संभाजी चौकात रोखून धरल्याची घटना आज सकाळी घडली. तथापि पोलिसांचा विरोध धुडकावून मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली.
बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला आज सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे पोलीसांनी रोखून धरले. पोलीस प्रशासनाची परवानगी नसताना मोर्चा काढण्यात येत असल्याचे कारण सांगून पोलिसांनी चारही बाजूला बॅरिकेट्स टाकून जवळपास अर्धा तास धर्मवीर संभाजी चौकामध्ये मोर्चा अडवून धरला. तथापि कोणत्याही परिस्थितीत मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करत मोर्चात सहभागी नेते, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी ध. संभाजी चौकातच बैठक मारून घोषणाबाजीला सुरुवात करून परिसर दणाणून सोडला.
संयुक्त महाराष्ट्राच्या गगनभेदी घोषणा आणि समितीच्या नेतेमंडळींनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिसांना अखेर नमते घ्यावे लागले आणि मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले. हा भव्य मोर्चा यंदे खुट, कॉलेज रोड आणि चन्नम्मा सर्कलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.