मराठी भाषिकांच्या येत्या 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या सायकल फेरीला परवानगी दिली जाणार नाही असे आज पुन्हा एकदा पोलीस खात्याने स्पष्ट केल्यानंतर परवानगी का दिली जाणार नाही नाही? त्याचे लेखी कारण आम्हाला द्यावे, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी केली आहे.
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली येत्या 1 नोव्हेंबर काळा दिनी कडकडीत हरताळ पाळून सायकल फेरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीच्या परवानगीसाठी आज गुरुवारी मार्केट विभागाच्या सहाय्यक पोलिस उपायुक्तांच्या कार्यालय आवारात मध्यवर्ती म. ए. समितीची नेतेमंडळी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत खडेबाजार उपविभागाचे पोलीस एसीपी चंद्रप्पा आणि मार्केट विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमणी यांनी कोरोनाच्या संकटामुळे येत्या 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काळा दिन पाळून जी सायकल फेरी काढण्यात येणार आहे तिला परवानगी देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजीची सायकल फेरी व इतर आंदोलनात्मक कार्यक्रम रद्द करावेत असेही सांगितले. यावेळी समितीच्या उपस्थित नेतेमंडळींनी काळ्या दिनाच्या कार्यक्रमांवर बंदी घालणार असाल तर ती बंदी कशासाठी घालत आहात? याचे कारण आम्हाला लेखी द्यावे, अशी मागणी पोलीस अधिकार्यांकडे केली. पोलिस अधिकाऱ्यांनी देखील लवकरच लेखी सबळ कारण तुम्हाला दिले जाईल असे आश्वासन दिले आहे.
बैठकी प्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, विकास कलघटगी, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण -पाटील, ॲड. एम. जी.पाटील आणि खानापूर तालुका म. ए. समिती युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील उपस्थित होते.
त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनातर्फे एसीपी चंद्रप्पा, एसीपी सदाशिव कट्टीमणी यांच्यासह बेळगाव ग्रामीण एसीपी गणपती गुडाजी, खडेबाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निंबाळकर, कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धर्मट्टी, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर व उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज शिंदे हे पोलिस अधिकारी बैठकीला हजर होते.