सीमाभागातील जनतेवर होणारे अन्याय अत्याचार आणि ठोकशाहीला प्रखर विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने सालाबाद प्रमाणे जपली आहे .
केंद्र सरकारने 865 खेड्यांचा सीमाभाग कर्नाटकात डांबला याचा निषेध दरवर्षी एक नोव्हेंबरला काळा दिन पाळून केला जातो. याच पार्श्वभूमीवर या वर्षीही एक नोव्हेंबरला काळा दिन पाळला जाणार आहे. तर त्यापूर्वी प्रशासनाला आपली भूमिका समजावून सांगण्यासाठी 25 ऑक्टोबरला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने त्या संदर्भातील एक पत्र बेळगावच्या पोलीस आयुक्तांना दिले असून या दोन्ही निषेध कार्यक्रमाला परवानगी देण्याची मागणी केली आहे. 25 ऑक्टोबरला धर्मवीर संभाजी चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात करून कॉलेज रोड चन्नम्मा सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात येणार आहे .
तर एक नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता धर्मवीर संभाजी उद्यान या ठिकाणी काळा दिनाच्या फेरीला सुरुवात करून पारंपारिक मार्गाद्वारे फेरी काढली जाणार आहे. मूक सायकल फेरी पारंपरिक मार्गाने जाऊन अकरा वाजता मराठा मंदिर येथे संपली जाणार असून त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी देऊन लोकशाहीच्या मार्गाने आपला आवाज उमटवण्याची संधी देण्यात यावी. अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे.