Monday, December 30, 2024

/

राज्योत्सव मिरवणूक : चंदरगी यांनी दिला सरकारला ‘हा’ इशारा

 belgaum

1 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरात कर्नाटक राज्योत्सवाच्या भव्य मिरवणुकीला परवानगी मिळावी यासाठी बेळगावच्या सर्व आमदारांनी सरकारवर दबाव आणावा. तसेच सरकारने येत्या 22 ऑक्टोबरपूर्वी भव्य प्रमाणातील मिरवणुकीस परवानगी दिलीच पाहिजे अन्यथा बेळगावसह संपूर्ण कर्नाटकातील कन्नड संघटनांना आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा शहरातील कन्नड संघटनांच्यावतीने कन्नड नेते अशोक चंदरगी यांनी दिला आहे.

कोरोना संकट अद्याप टळले नसल्यामुळे येत्या 1 नोव्हेंबर रोजी साजरा केल्या कर्नाटक राज्योत्सवाच्या मिरवणुकीवर देखील निर्बंध घालण्यात येणार असल्याची कुणकुण लागल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कन्नड संघटनांची बैठक आज शनिवारी सकाळी कन्नड साहित्य भवन येथे पार पडली. या बैठकीत राज्योत्सव मिरवणूकीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना अशोक चंदरगी यांनी उपरोक्त इशारा दिलाय.

येत्या 1 नोव्हेंबर राज्योत्सव दिनादिवशी भव्य प्रमाणात मिरवणूक काढता येणार नाही असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यासंदर्भात आज आमची बैठक पार पडली. राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत बेळगाव शहरात राज्योत्सवाची भव्य मिरवणूक काढण्यास परवानगी दिलीच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. यासाठी सरकारला आम्ही येत्या 22 ऑक्टोबरपर्यंत मुदत देत आहोत, तत्पूर्वी सरकारने निर्णय घेऊन या मिरवणुकीला परवानगी द्यावी. त्याचप्रमाणे बेळगावातील सर्व आमदारांनी राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी मिळावी यासाठी राज्य सरकारवर दबाव आणावा अशीही आमची मागणी आहे. राज्योत्सव मिरवणुकीवर निर्बंध घालताना कोरोनाचे जे कारण पुढे केले जात आहे ते निखालस खोटे आहे. कारण भाजप सरकारला लोकसभा पोटनिवडणूक घेता येते, दसरा दौडला परवानगी देता येते, मिरवणुका काढता येतात, मनपा निवडणूक घेता येते यासर्वला परवानगी मिळते तर मग राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी का नाही? हा आमचा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सवाल आहे, असे चंदरगी यांनी सांगितले.

राज्य सरकारने 22 ऑक्टोबरपर्यंत बेळगावातील राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी दिली नाही तर 23 तारखेपासून बेळगाव संपूर्ण कर्नाटकातील कन्नड संघटनांसमोर आंदोलन छेडण्यात शिवाय पर्याय उरणार नाही. यासाठी माझी मुख्यमंत्री बोम्मई यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी बेळगावात भव्य राज्योत्सव मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला करावी. जोपर्यंत राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी मिळत नाही तोपर्यंत राज्योत्सवासंदर्भातील प्रशासनाच्या कोणत्याही बैठकीला कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत, असा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्याप्रमाणे राज्योत्सव मिरवणुकी संदर्भातील आम्ही आमच्या मागणीचे निवेदन येत्या सोमवारी जिल्हाधिकार्‍यांना सादर करणार आहोत. मिरवणुकीला परवानगी दिली नाही तर कन्नड संघटना राज्योत्सवावरच बहिष्कार टाकण्यास मागेपुढे पाहणार नाहीत ती वेळ येण्यापूर्वी सरकारने मिरवणुकीला परवानगी द्यावी, असेही अशोक चंदरगी यांनी शेवटी स्पष्ट केले. याप्रसंगी शहरातील विविध कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.