गोकाक येथील प्रख्यात वकील नानासाहेब देशपांडे यांची नात मायरा श्रेयस देशपांडे (वय 7) हिने जगातील सर्वात उंच शिखर म्हणून ख्याती असणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट शिखरावरील 5,550 मीटर उंचीवरील काळा पत्थरपर्यंतचे अंतर सर करण्याचा पराक्रम केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मायरा ही सध्या गोरेगाव मुंबई येथे वास्तव्यास आहे. तिचे वडील श्रेयस देशपांडे हे मुंबई येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था चालवतात. त्यांनी पत्नी सुभाश्री हिच्या समवेत पुण्याच्या गिर्यारोहक संस्थेच्या सहकार्याने समुद्रसपाटीपासून 8,863 मीटर उंच असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवर गिर्यारोहण करण्याचे योजले.
या खडतर गिर्यारोहणासाठी आपणही येणार म्हणून त्यांची मुलगी मायरा हिने हट्ट केला. मात्र गिर्यारोहक संस्थेने तिला परवानगी दिली नाही.
गिर्यारोहक संस्थेने परवानगी नाकारली तरी श्रेयस देशपांडे व कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर मायराला सोबत घेतले. पुण्यातील अन्य 8 गिर्यारोहक सदस्य व दोघे संस्थाचालक अशा एकूण 13 जणांनी गेल्या 9 सप्टेंबर रोजी काठमांडू व 10 रोजी एव्हरेस्टच्या पायथ्यावरील लुकला येथून मोहीम सुरू केली. त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी 5,360 मीटर वरील बेस कॅम्पवर पोहोचून तेथून 5,550 मीटर उंचीवरील कालापत्थर पर्यंत मजल मारली.
यावेळी मायरा देखील त्यांच्यासोबत होती. सर्वांनी 5,360 मीटर बेस कॅम्पपासून पुढे बर्फाच्छादित गिर्यारोहणासह अत्यंत खडतर प्रवास करत 5,550 मीटर पर्यंत मजल मारली. या मोहिमेदरम्यान अवघ्या 7 वर्षाच्या मायरा हिने दाखविलेले धाडस आणि जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.