बेळगाव महानगरपालिका निवडणूक झालीच पाहिजे असा आग्रह धरून ती निवडणूक घ्यावयास लावली. या निवडणुकीत 35 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपने बहुमत सिद्ध केल्यामुळे महापालिका आमच्या ताब्यात आली आहे. तेंव्हा आता दसरा सणानंतर लगेच महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे, असे मत बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
शहरात आज गुरुवारी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. बेळगाव महापालिकेचा कारभार त्रयस्थांनी चालवणे योग्य नाही. नगरसेवक आपापल्या प्रभागात कामाला देखील लागले आहेत. त्यामुळे दसरा सणानंतर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होण्यास कांहीच हरकत नाही, असे आमदार ॲड. बेनके यांनी सांगितले.
बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडा बैठकींसंदर्भात बोलताना बुडा मधील बैठकीबाबत मला कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती.
बुडाची बैठक ज्यादिवशी होती त्या दिवशी मी बेंगलोर येथे एका बैठकीमध्ये व्यस्त होतो. ज्या दिवशी मी मोकळा असेन त्या दिवशी बुडाची बैठक ठेवल्यास मी त्या बैठकीस निश्चितपणे हजर राहीन, असेही आमदार ॲड. अनिल बेनके यांनी स्पष्ट केले.