बेळगावातील आरोग्य खात्याच्या कर्मचारी असणाऱ्या नामांकित महिला जलतरणपटू ज्योती कोरी यांनी बेंगलोर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या 22 व्या राज्य मास्टर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेमध्ये दोन सुवर्णपदकांसह एकूण 6 पदके हस्तगत करून घवघवीत यश संपादन केले.
कर्नाटक राज्य जलतरण संघटनेतर्फे आरपीसी लेआउट बेंगलोर येथील महापालिका जलतरण तलावाच्या विजयनगर ॲक्वेटिक सेंटरमध्ये गेल्या 9 व 10 ऑक्टोबर रोजी 22 व्या राज्य मास्टर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2020 -21 चे आयोजन केले होते.
यामध्ये बेळगावच्या जलतरणपटू ज्योती कोरी यांनी 100 मी. बॅकस्ट्रोक व 100 मी. बटरफ्लाय स्ट्रोक शर्यतीमध्ये सुवर्णपदके, 100 मी. व 50 मी. बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य पदके, तर फ्रीस्टाइल रिले आणि मिडले रिले शर्यतीमध्ये रौप्य पदके अशी एकूण दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशा सहा पदकांची कमाई केली.
गेल्या मार्चमध्ये झालेल्या कर्नाटक राज्य मास्टर्स गेम्समध्ये देखील ज्योती कोरी यांनी स्पृहणीय यश संपादन केले होते. या पद्धतीने त्यांनी यापूर्वी अनेक जलतरण स्पर्धांमध्ये स्वतःसह बेळगावचा नांवलौकिक वाढविला आहे.
ज्योती कोरी या बेळगाव आरोग्य खात्याच्या कर्मचारी असून त्या कडोली (ता. जि. बेळगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सेवा बजावत आहेत. उपरोक्त यशाबद्दल त्यांचे आरोग्य खात्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.