कर्नाटकातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच सीमावासियांच्या पाठीशी आहे. सीमा भागाबाबत असलेला विवादित शब्द महाराष्ट्र शासनाने वगळला आहे. बेळगाव जवळील शिनोळी येथे महाराष्ट्र शासनाकडून कौशल्य आधारित शिक्षण महाविद्यालयाची स्थापना होणार आहे. त्याशिवाय सीमाभागातील देवचंद महाविद्यालयासाठी विविध सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सीमाभागातील 865 गावांवर महाराष्ट्र शासनाचा हक्क असून ती लवकरच महाराष्ट्रात समाविष्ट केली जातील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
अर्जुननगर (ता. कागल, महाराष्ट्र) येथील देवचंद महाविद्यालयात काल गुरुवारी सायंकाळी आयोजित बहुउद्देशीय व्यायामशाळा आणि संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन समारंभप्रसंगी उद्घाटक या नात्याने ते बोलत होते. देवचंद महाविद्यालयाने सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
सीमावर्ती भागातील कष्टकरी कुटुंबातील मुलांना अत्याधुनिक सुविधांसह शिक्षण देण्याचे काम निरंतरपणे सुरू ठेवले आहे. बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी भाषिक सर्वच गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे असे सांगून महाराष्ट्रातील महाआघाडीचे सीमाभागावर लक्ष असून यापुढेही सीमाभागातील महाविद्यालयांना सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिष भाई शाह यांनी पद्मभूषण देवचंदजी शाह आणि किरणभाई शाह यांच्या सीमावासियांबाबत असणार्या शैक्षणिक स्वप्नांची पूर्तता करण्याचे काम सुरू असल्याचे सांगून संस्थेच्या माध्यमातून सीमाभागातील विद्यार्थ्यांना अत्यंत कमी दरात विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष तृप्ती शाह, प्रतिभा शाह, प्रकाश शाह, संचालक संदीप मोकाशी, प्रसन्नकुमार गुजर, सुबोधभाई शाह, प्रभारी प्राचार्य पी. पी. शाह, प्रविणभाई शाह, प्रा. नानासाहेब जमादार, प्रा. राजकुमार कुंभार, रमेश देसाई यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी संचालक, सभासद, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.