Saturday, December 21, 2024

/

खानापूरचे माजी आमदार कमळाबाईच्या प्रेमात

 belgaum

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे गळू गेली सात ते आठ वर्षे ठसठसत आहे एका बाजूला दिगंबर पाटील गट आणि दुसरीकडे अरविंद पाटील गट यांच्यात रस्सीखेच चालूचं आहे.62 वर्षे एकनिष्ठ असणारी खानापूर तालुक्यातील जनता ही झालेली गजकर्ण कशी संपवायची याच विचारात आहेत. समितीचा लढा खानापूरच्या निष्पाप जनतेनी एकनिष्ठेने दिला आहे.गरीब बापडा जंगलातून पसरलेला मराठी माणूस काटे कुठे तुडवत ओढे नाले ओलांडत समितीच्या आंदोलनात सहभागी होतो पण मी पणाच्या गर्तेत अडकलेले दोन्ही माजी आमदार मी मोठा की तू मोठा,माझा गट मोठा की तुझा गट मोठा,मी खरा समितीवाला की तू खरा समितीवाला, या साठमारीत खानापूरच्या जनतेला अक्षरशः अंकुश लाऊन घायाळ केलेलं आहे.

या दोन्ही माजी आमदारांचे लक्ष हे सीमा लढा नसून सत्ता केंद्रीकरण आहे. माझ्या गटाचा आमदार झाला पाहिजे किंवा मीच आमदार झालो पाहिजे या हेकट वृत्तीने खानापूर समिती पार वणव्यात घालून ठेवली आहे.सीमा वर्तीय मराठी हा इतकी वर्षे लढतोय ते केवळ मराठीच्या भल्यासाठी. मराठी माणसाने सत्ता या लोकांच्या हातात दिली त्यांनी करंटेपणा करून सत्तेचे मात्रं केलं. आता खानापूरच्या जनतेला संधी आली आहे या बाजार बुडग्यांना बाजूला करून एकनिष्ठ समितीचा तेजस्वी लढा पुन्हा उभा करण्याची…Arvind patil ex mla

पडेल आमदारांनी कितीही शक्ती प्रदर्शन केली तरी त्यांची औकात खानापूरची जनता ओळखून आहे, हे पडले दुहीने मराठी माणसाला एकत्र करतीलचं काय?वाट चुकेलेलं वासरू समजून परत परत कितीही वेळा गद्दारी केली तरी अरविंद पाटील यांना समितीने पावन करून घेतलं होतं आणि आमदार पदही दिलं होतं तेच अरविंद पाटील कन्नड भाषिकांच्या जीवावर समितीचा भगवा टाकून कमळ फुल हातात घेण्यास धावत आहेत.घर जाळून राखेचा धंदा करणाऱ्यांना समितीने वेळीच ओळखलं असते तर बरं झालं असत.आता नवीन नेतृत्व उभे करण्याची गरज निर्माण झाली आहे.महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुक्याच्या नसानसात भिनली आहे.कुणाचीही पाटीलकी खानापूरची जनता आपल्यावर लादून घेणार नाही.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दिगंबर पाटील यांचा गट वारंवार देवाप्पा गुरव यांच्याकडे पत्र पाठवून एकी करण्याचे सुतोवाच करत आलाय, मध्यवर्ती समितीकडेही त्यांनी एकीची मागणी या अगोदर केली होती पण मध्यवर्तीने स्पष्ट कोणतीही भूमिका लवकर न घेतल्याने प्रकरणाला वेगळंच वळण लागत गेले, दिगंबर पाटील यांनी आततायीपणा करत मध्यवर्ती समितीच बरखास्त करा असा पवित्रा घेतला पण त्याचं दिवशी मराठा मंदिर येथील समितीच्या बैठकीमुळं दिगंबर पाटील आवाहनातील हवाच निघून गेली.त्यानंतर दिगंबर पाटील यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची भेट घेऊन कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्र नेत्यांनी ठोस आश्वासन दिले नाहीत दरम्यान मध्यवर्ती एकीकरण समिती चार्जिंग मोड मध्ये आली आणि कार्यकारिणीच्या बैठकीत खानापूर समिती अध्यक्ष देवाप्पा गुरव यांना माजी आमदार अरविंद पाटील यांची भूमिका आठवडा भरात स्पष्ट करण्याची सूचना केली.देवाप्पा गुरव यांनी अरविंद पाटील यांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट करण्यासंबंधी कळवले त्याला कोणताच प्रतिसाद न देता माजी आमदार अरविंद पाटील यांनी आपले शक्ती प्रदर्शन करत मीच नेता कसा मोठा याचे लोकांना चिंतन करण्याची बैठक बोलावली.बैठकीत अरविंद पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अश्या राष्ट्रीय भाषेतील घोषणा ऐकल्यावर खानापूरच्या जनतेने ओळखले की अरविंद भाजपच्या वाटेवर आहेत.

एका बाजूला आमदार अंजलीताई निंबाळकर मराठी माणसांना साद घालत कामाचा धडाका उडवत बऱ्याच वेळा स्टंट करत आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप हिंदुत्ववादी कार्यकर्ते गोळा करत आपल्या बॅंडकूळया फुगवून दाखवत आहेत.या पाश्वभूमीवर खानापूरच्या मराठी माणसाकडे नामी संधी उपलब्ध झाली असून एकी करत परत मराठीचा झेंडा खानापूर मध्ये फडकू शकतो यासाठी नेत्यांनी हेवेदावे बाजूला ठेऊन कुणाच्याही हातातल बाहुल न होता एकी करणे गरजेचे आहे.अरविंद पाटील भाजपात गेले म्हणून समिती संपणार नाही हे त्रिकलाबाधित सत्य आहे आणि अश्या संधी साधू लोकांचे मलप्रभेत विसर्जन करण्यात खानापूरची जनता समर्थ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.