नवरात्रोत्सव काळात शहरातील दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानाच्यावतीने गेल्या तीन वर्षापासून देवीच्या भव्य मूर्ती साकारण्यात येत असून यंदा मंदिराच्या आवारात दक्षिण काशी कुलस्वामिनी देवीची 16 फुटी भव्य लक्षवेधी मूर्ती स्थापण्यात आली आहे.
श्री कपिलेश्वर देवस्थानच्यावतीने दक्षिणकाशी श्री कपलेश्वर मंदिरात गेल्या तीन वर्षापासून नवरात्रीमध्ये देवीची दररोज वेगवेगळी रूप साकारण्यात येतात. तसेच दररोज देवीची वेगवेगळी अलंकार पूजा करण्यासोबतच विविध देखावे सादर केले जातात.
गेल्या 2019 पासून मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवात देवीची ठराविक रूपातील भव्य मूर्ती साकारण्यात येते. पहिल्या वर्षी 2019 साली श्री महिषासूरमर्दिनी आणि 2020 साली श्री महाकाली या देवींच्या मुर्ती साकारण्यात आल्या होत्या. यंदाच्या वर्षी दक्षिण काशी कुलस्वामिनी देवीची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
श्री कपिलेश्वर मंदिर आवारातील मंडपात उभारण्यात आलेली ही दक्षिण काशी कुलस्वामिनी देवीची मूर्ती 16 फूट उंच असून तिच्या चारही हातात आयुधे आहेत. संपूर्णपणे हीटलाॅनपासून बनविण्यात आलेली ही अतिशय देखणी मूर्ती मूर्तिकार वसंत पाटील यांनी बनविली आहे. यासाठी त्यांना जवळपास 15 दिवसांचा कालावधी लागला आहे. त्याचप्रमाणे देवीच्या मूर्ती समोरील मंडपातील लाईट व डेकोरेशन विनायक डेकोरेटर्सचे विनायक पालकर आणि लाईट अँड पोगो साऊंड सिस्टीमचे अभी पवार यांनी केले आहे.
श्री कपलेश्वर मंदिर आवारातील उपरोक्त भव्य मूर्तीचा अनावरण सोहळा नुकताच खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते पार पडला.