साउथचे सुपरस्टार आणि कन्नड चित्रपट सृष्टीचे ‘पॉवर स्टार’ पुनीत राजकुमार यांचे शुक्रवारी हृदयाचा निधन झाले. पुनीत यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांच्या दोन चाहत्यांनी देखील जगाचा निरोप घेतल्याच्या घटना बेळगावात घडल्या आहेत.
सुप्रसिद्ध कन्नड अभिनेता पाॅवर स्टार पुनीत राजकुमार यांचे काल शुक्रवारी आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांचे करोडो चाहते आणि हितचिंतकांना मोठा धक्का बसला. तसाच जबर धक्का बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावच्या एका युवकाला बसून त्यातच त्याचा मृत्यू झाला.
शिंदोळी येथील परशराम हनुमंत देमन्नवर (वय 33, रा. कनकदासनगर) याचे टीव्हीवर पुनीत त्यांच्या निधनाचे वृत्त पाहत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुली काम करणारा परशराम हा सुपरस्टार शिवराजकुमार आणि पुनीत राजकुमार यांचा निस्सीम चाहता होता, असे स्थानिकांनी सांगितले.
अथणी तालुक्यातही अशीच परंतु वेगळ्या स्वरूपाची घटना घडली आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने एका चाहत्याने आपले जीवनच संपवल्याची घटना अथणी येथे घडली आहे.
अथणी येथील राहुल गाडीवड्डर (वय 26) या पुनीत यांच्या चाहत्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पुनीत राजकुमार यांच्या फोटोला श्रद्धांजली अर्पण केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर घटनेची अथणी पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.