बेळगांवच्या स्नुषा डॉ. कल्पना सुहास गोडबोले यांना मुंबई येथे राजभवनामध्ये काल शुक्रवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्राचा कोरोना योद्धा -2021’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
शहरातील रविशंकर आर्केड, एसबीजे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजसमोर गणेशपुर रोड येथील सुप्रसिद्ध डॉ. सुहास गोडबोले यांच्या सुविद्य पत्नी डॉ. कल्पना गोडबोले यांना महाराष्ट्राच्या कोरोना योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
दत्तगुरु सोसायटी, आनंदगड, विक्रोळी (पश्चिम) मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या डॉ. कल्पना गोडबोले यांनी कोरोना प्रादुर्भावाला प्रारंभ झाल्यापासून संपूर्ण मुंबई शहरासह बेळगावच्या आसपास असणाऱ्या खेडेगावांतील एकूण 6.45 लाख लोकांना रोग प्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अल्बम या औषधी गोळ्यांचे वितरण केले आहे. त्यांनी मुंबई पोलिसांच्या कोवीड ट्रीटमेंट हेल्पलाइनसाठी कार्य करताना मुंबई, बेळगाव आणि हरिहर येथील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम 30 चा पुरवठा केला आहे. डॉ. कल्पना गोडबोले या आपल्या पतीच्या मदतीने झोपडपट्टी भागात सातत्याने वैद्यकीय शिबिरे घेत असतात. कोरोना महामारी काळात त्यांनी झोपडपट्टी भागात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सॅनीटायझर मशीन देणगीदाखल दिली आहे. त्याचबरोबर जनजागृती करण्याद्वारे झोपडपट्टीवासीयांना स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत प्रेरित केले आहे. या खेरीज डॉ. कल्पना या देशभरात ऑनलाइन वैद्यकीय सत्रांचे आयोजन करत असतात.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी मुंबईतील सर्व समाजांमध्ये कोवीड कवच् कार्यक्रम आयोजित केले आहेत. डॉ. कल्पना गोडबोले या कोरोनातून बऱ्या झालेल्यांच्या पुर्नवसनासाठी मदत करत असतात. याव्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रात पुराचा तडाखा बसलेल्या भागांमध्ये वैद्यकीय शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे.
बेळगावच्या स्नुषा असलेल्या डॉ कल्पना सुहास गोडबोले यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन मुंबईच्या राजभवनातील दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात काल शुक्रवारी त्यांना यंदाचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्राचा कोरोना योद्धा -2021’ हा पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याबद्दल डॉ. कल्पना गोडबोले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.