नोकरी, घरकाम, मुलांची देखभाल हे सारे करत असताना स्वतःही आपल्या वयाच्या एका वेगळ्या टप्प्यावर आल्यानंतर जलतरणाच्या क्षेत्रात आघाडी घेऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात सुवर्ण भरारी मारलेल्या बेळगावच्या सुवर्ण मातेने आता आणखी तीन सुवर्णपदके मिळवून आणखी एक सुवर्ण भरारी घेतली आहे.
ज्योती होसट्टी असे या महिलेचे नाव असून प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय कर्मचारी असलेल्या महिलेने नुकत्याच झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्रीडा मेळाव्यामध्ये हे यश मिळवले.
दावणगिरी येथे 100 मीटर बॅक, 100 मीटर बटरफ्लाय आणि 200 मीटर फ्री स्टाइल अशा तीन प्रकारात प्रथम येऊन तीन सुवर्णपदके मिळवण्याचा मान पटकावला आहे. शनिवारी या स्पर्धा झाल्या.
शुक्रवारी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमानंतर ज्योती होसट्टी यांनी जलतरणातील आपली कला दाखवत संपूर्ण कर्नाटकातून आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आपण सरस असल्याचे सिद्ध केले आहे.
आपल्या मुलाच्या जलतरण सरावासाठी जाणाऱ्या ज्योती होसट्टी यांनी स्वतः पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांनी फक्त कर्नाटक राज्यातच नव्हे तर देशात आणि विदेशात ही आपली छाप पाडली.
आता तर त्या कुठल्या स्पर्धेत भाग घेतील तेथे सुवर्णपदकाच्या मानकरी ठरत असून त्यांच्यामुळे बेळगावची मान नक्कीच अभिमानाने उंचावली जात आहे.