बेळगाव शहराच्या दक्षिण मतदार संघातील 12 आणि उत्तर मतदारसंघात 10 अशा एकूण 22 अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई होणार असून लवकरच आयुक्तांकडून त्याबाबतचा लेखी आदेश बजावला जाणार आहे.
बेळगाव शहरातील 22 अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई होणार आहे. या सर्व 22 इमारतींना बजावलेल्या नोटीसींवर महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी कारवाईचा आदेश बजावणार आहेत.
या बांधकामाशी संबंधित नोटिसांवरील सुनावणी पूर्ण झाल्याची माहिती नगररचना विभागातून मिळाली आहे. सदर 22 अनधिकृत बांधकामांमध्ये शहराच्या दक्षिण भागातील बारा आणि उत्तर भागातील दहा बांधकामाचा समावेश आहे. या बांधकामांना बजावण्यात आलेल्या नोटीसींवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू सुनावणी सुरू होती. गेल्या महिन्याभरात आयुक्तांनी दोन वेळा सुनावणी घेतली होती.
बेळगाव महापालिकेने केलेल्या चार वर्षात शहरातील सुमारे 200 बांधकामांना नोटीस बजावली आहे. तथापि तत्कालीन आयुक्तांनी या नोटीसींवर नियमितपणे सुनावणी घेतली नसल्याने त्यावर निर्णय झालेला नाही. विद्यमान आयुक्त डॉ. घाळी यांनी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर या नोटीसींबाबतची माहिती घेतली. गेल्या अनेक वर्षापासून या नोटीसींवर निर्णय झाला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच सप्टेंबरमध्ये त्यांनी पहिल्यांदा या नोटीसींवर सुनावणी घेतली.
त्यावेळी 12 नोटीसींवरील सुनावणी पूर्ण केल्यानंतर संबंधित बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आता गेल्या मंगळवारी त्यांनी आणखी 10 नोटीसींवरील सुनावणी पूर्ण केली. तसेच त्या बांधकामांवर देखील कारवाई करण्याचा निर्णय घेतला. संबंधित बांधकामांवरील कारवाईचा लेखी आदेश लवकरच काढला जाणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.