प्रचंड मोठा आवाज करून इतरांच्या हृदयात धडकी बसवणार्या आणि झोप उडवणाऱ्या वाहनांवर कारवाईचा सपाटा बेळगाव पोलिसांनी जोरात सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक वाहने जप्त करून मॉडिफाइड सायलेन्सर असलेल्या वाहनांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून आता अशा प्रकारचा त्रास जाणवल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांनाही करण्यात आले आहे.
दैनंदिन जीवनात प्रचंड मोठा आवाज करत जाणाऱ्या वाहनांचा त्रास वाढला होता. बुलेट सारख्या दुचाकींचे सायलेन्सर फोडून त्याचा धडकी भरवणारा आवाज करण्यात युवावर्ग आघाडीवर होता.
त्याच बरोबरीने जुनाट प्रकारच्या ऑटो रिक्षा चा सायलेन्सर फोडून त्यातून ही विचित्र आवाज काढत प्रवाशांना घेऊन फिरणारे रिक्षावाले वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले. फक्त बुलेट किंवा ऑटोरिक्षा नव्हे तर सायलेन्सर चा चुकीचा वापर करून इतरांची धडधड वाढवणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांवर कारवाई होत आहे.
आता अशा प्रकारचे वाहन आढळल्यास त्याचा फोटो किंवा व्हिडिओ काढून तो एका व्हाट्सअप्प क्रमांक च्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला द्यावा. असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे दाखल झाल्यास संबंधित वाहनांवर तातडीने कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली असून संबंधित नंबर आता प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईल क्रमांक वर सेव्ह करण्याची गरज आहे.
अशा प्रकारे इतरांची झोप उडवत वाहन चालवणाऱ्याचा फोटो आणि व्हिडिओ काढून तो 7019998941 या व्हाट्सअप क्रमांकावर दिल्यास संबंधितावर तातडीने कारवाई होणार असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.