Thursday, December 19, 2024

/

माजी मुख्यमंत्र्यांचे मराठी भाषकांबाबत वादग्रस्त वक्तव्य

 belgaum

पोलिसांनी कितीही दडपशाही केली तरी मराठी कागदपत्र आणि फलकांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या 25 रोजीचा विराट मोर्चा यशस्वी केला. त्यामुळे पोटशूळ उठलेले माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे समिती नेत्यांना गुंड असे संबोधून त्यांना चांगला धडा शिकवा, असे सोशल मीडियावर बरळले आहेत. त्यावर सीमाभागातून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीने काढलेला भव्य मोर्चा मराठी व्देष्ट्या कन्नड संघटना आणि नेत्यांना पचनी पडलेला नाही. त्यामुळे एकामागून एक आरोप करण्यात येत आहेत. बुधवारी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सलग ट्विट करत समितीवर तोंडसुख घेतले. म. ए. समिती विनाकारण बेळगावच्या कन्नडीगांवर हल्ला करत आहे. कन्नडचा अपमान करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांना चांगलाच धडा शिकवावा लागेल. गेल्या अनेक निवडणुकात समितीचा मुखभंग झाला आहे. परिणामी आता कन्नड राज्योत्सवाच्या तोंडावर त्यांनी गुंडगिरी सुरू केली आहे. कन्नड अस्मितेवर हल्ले करण्यात येत आहेत. कन्नडिगांचा अपमान करणे अशी कामे समितीकडून होत आहेत असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.

समितीने कांही दिवसांपूर्वी काढलेल्या मोर्चात गुंडगिरी करण्यात आली. हा मोर्चा विनाकारण काढण्यात आला होता. राजकीय लाभ उठवण्यासाठी आपल्या अस्तित्वासाठी बेळगावात म. ए. समिती गुंडगिरी करत आहे. गोंधळ निर्माण करत आहे. भाषा बांधाव्य आणि शांततेला धक्का पोहोचवत आहे. त्यामुळे सरकारने राज्याच्या अस्मितेसाठी याकडे दुर्लक्ष करू नये. कन्नडचा अपमान करणाऱ्या समितीला चांगलाच धडा शिकवावा, अशी मागणी कुमारस्वामी यांनी सरकारकडे केली आहे.

समितीच्या मोर्चाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे मराठी द्वेष्ट्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून समितीवर आग ओकण्यात येत आहे, असा आरोप समितीकडून होत आहे.

दरम्यान, कुमारस्वामी यांनी केलेल्या आरोपांमध्ये समितीने सरकारी कार्यालयात मराठीतून कागदपत्रांची मागणी केली आहे. कर्नाटक सरकार नालायक आहे असा अपमान केला आहे. तसेच जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या आहेत हे सहन करणार नाही असे म्हंटले आहे. त्यामुळे कुमारस्वामी यांना मराठीची मागणी आणि जय महाराष्ट्र घोषणा फारच झोंबली असल्याचे दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.