इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत केरळ ब्लास्टर संघाचे प्रतिनिधित्व केलेला आणि भारतातर्फे कनिष्ठ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा खेळलेल्या लखनऊच्या हर्षवर्धन या नामांकित युवा फुटबॉलपटूला बेळगावच्या मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनने करारबद्ध केले आहे. या पद्धतीने भारताचे प्रतिनिधित्व केलेला एखादा फुटबॉलपटू प्रथमच बेळगावच्या संघातून खेळणार आहे.
बेळगावातील मानस स्पोर्ट्स फाऊंडेशन (एमएसडीएफ) ही संस्था गेल्या कांही वर्षापासून चांगले दर्जेदार क्रीडापटू घडविण्याबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या उन्नतीसाठी झटत आहे. बेळगावच्या स्थानिक उदयोन्मुख फुटबॉलपटूना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंबरोबर खेळण्याचा अनुभव मिळावा त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने एमएसडीएफने यंदा लखनौचा आघाडीचा युवा फुटबॉलपटू हर्षवर्धन याला करारबद्ध केले आहे.
कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेतर्फे बेंगलोर येथे येत्या नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केल्या जाणाऱ्या युथ प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये हर्षवर्धन हा एमएसडीएफ आणि बेळगाव युनायटेड फुटबॉल अकॅडमी यांच्या संयुक्त संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या पद्धतीने पहिल्यांदाच एखादा अंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला फुटबॉलपटू बेळगावच्या संघातून खेळणार आहे.
मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष मानसकुमार नायक यांनी बेळगाव लाईव्हला दिलेल्या माहितीनुसार, लखनौ येथील हर्षवर्धन हा 17 वर्षीय फुटबॉलपटू इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत केरळ ब्लास्टर संघाकडून मधल्या फळीतील खेळाडू म्हणून खेळला आहे. त्याचप्रमाणे त्याने 14 व 16 वर्षाखालील कनिष्ठ आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आतापर्यंत भारतासाठी खुल्या गटासह सर्व वयोगटातील जवळपास 86 मातब्बर खेळाडू घडविणारी पंजाब येथील मिनर्व्हा फुटबॉल अकॅडमी या देशातील मातब्बर अकॅडमीकडून हर्षवर्धन खेळला आहे.
अशा या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनुभवी खेळाडूंबरोबर बेळगावच्या स्थानिक उदयोन्मुख फुटबॉलपटूना खेळण्याचा अनुभव मिळावा त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी. बेळगावातील फुटबॉलचा दर्जा उंचवावा या उद्देशाने आम्ही त्याला करारबद्ध केले आहे, असेही मानसकुमार नाईक यांनी सांगितले.