राज्यात डेटा प्लस वाय 4.2 या नवीन कोरोना व्हायरस प्रकाराची दोन संशयित प्रकरणे आढळून आली असून नमुने जिनोम अनुक्रमांसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच संभाव्य आकस्मिक उपाययोजनांबाबत आपण तांत्रिक सल्लागार समितीची चर्चा केली आहे, अशी माहिती कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मंगळवारी दिली.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री डॉ. सुधाकर यांनी डेल्टा प्लस एवाय 4.2 प्रकारातील कोरोना व्हायरसची दोन संशयित प्रकरणे राज्यात आढळून आली आहेत आणि मी माझ्या विभागाला पुष्टी करण्यासाठी संबंधित नमुने जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याची सूचना केली आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे नमुने बेंगलोर येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये चांचणीसाठी पाठवले आहेत. दोन्ही बाधित व्यक्ती बेंगलोरचे आणि लक्षणे नसलेले आहेत, असेही आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी सांगितले.
एवाय 4.2 या नव्या व्हेरीएंटचे संशयित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सदस्यांशी संभाव्य आकस्मिक उपाययोजनांबाबत चर्चा केली आहे. तसेच या बाबतचे तज्ञांचे मत ते तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे सूत्रांकडून समजते. जीनोम अनुक्रम सुरू केला असून राज्यात 6 -7 जीनोम प्रयोगशाळा स्थापण्यात आल्या आहेत. त्यामुळे जेंव्हा जेंव्हा नवा व्हेरीएंट उदयास येईल, तेंव्हा सरकारला तज्ज्ञांकडून सल्ला मिळून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरशी चर्चा करता येईल. सध्या आढळून आलेला एवाय 4.2 व्हेरीएंट अकाली उदयास आला असला तरी बेसावध राहून चालणार नाही असे डाॅ. मंजुनाथ यांनी नमूद केले आहे.
व्हेरीएंट प्रसाराचा नमुना पाहता तिसरी लाट येणारच पण ती केंव्हा येईल सांगता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक सभा, कार्यक्रम विशेष करून राजकीय सभा आणि अधिवेशनाचे जे आयोजन केले जात आहे त्याबद्दल टास्क फोर्स चिंता लागून राहिली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनी नव्या व्हेरीएंटची भीती बाळगू नये. त्यांच्यावर विषाणूचा हलकासा परिणाम होण्याव्यतिरिक्त विशेष कांही होणार नाही, असे सांगितले. तसेच जनतेने घाबरण्याचे कारण नाही कारण या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने पुरेशी खबरदारी घेतली असल्याचेही मंत्री डॉ. सुधाकर यांनी स्पष्ट केले.