बेळगाव शहरानजीकच्या जुन्या राष्ट्रीय महामार्ग पासून हालगा गावाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा आणि टाकाऊ साहित्य फेकण्यात आल्यामुळे या रस्त्याला एखाद्या कचरा डेपो प्रमाणे स्वरूप प्राप्त झाले असून महापालिकेने याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
बेळगाव मार्गे हुबळी -धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील अलारवड क्रॉस नजीकचा सर्व्हिस रोड सध्या कचरा आणि घाणीचे माहेरघर बनला आहे. सदर रस्त्याच्या एका बाजूला प्रचंड प्रमाणात कचरा आणि टाकाऊ साहित्य फेकण्यात आले आहे.
या ठिकाणी कचरा टाकण्याचा हा प्रकार असाच सुरू राहिल्यास अल्पावधीत सदर सर्व्हिस रोड पूर्णपणे कचऱ्याखाली गाडला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने कांही ठिकाणी तो पेटवून देण्यात येत आहे. सदर कचऱ्यामध्ये टाकाऊ साहित्यासह मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा देखील आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्यामुळे या रस्त्याला एखाद्या कचरा डेपो प्रमाणे बकाल आणि गलिच्छ स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील कचरा व घाणीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी नजीकच्या राष्ट्रीय महामार्गपर्यंत जाणवत असल्यामुळे वाहन चालक आणि नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तरी बेळगाव महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर सर्व्हिस रोडवरील कचऱ्याची युद्धपातळीवर उचल करण्याचे आदेश द्यावेत. तसेच पुनश्च या रस्त्यावर कचरा फेकला जाणार नाही या दृष्टीने योग्य उपाययोजनाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.