सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका देवी अर्थात श्री यल्लम्मा दर्शन भाविकांसाठी खुले झाले असल्याने नवरात्र उत्सवानिमित्त वायव्य परिवहन महामंडळाने विशेष बससेवेची सोय करताना 40 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.
वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून दरवर्षी नवरात्र आणि श्री यल्लमा देवीच्या उत्सव काळात विशेष पिकअप पॉइंट सुरू करून प्रवाशांसाठी बेळगाव ते सौंदत्ती थेट विनाथांबा बससेवा सुरु केली जाते. यंदाही तशी व्यवस्था करण्यात आली असून बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर त्यासाठी विशेष पिकअप पॉइंट सुरू करण्यात आले आहेत.
कालपासून मध्यवर्ती बस स्थानकावर ही बस सेवा उपलब्ध असून नवरात्रपर्यंत ती कायम असणार आहे. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सौंदत्ती यल्लमा देवस्थान बंद ठेवण्यात आल्यामुळे परिवहन मंडळाची विशेष बस सेवा उपलब्ध नव्हती.
यंदा नवरात्र उत्सव काळात सौंदत्ती श्री यल्लामा देवी मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यामुळे देव दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंडळाने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी 40 बसेस राखीव ठेवण्यात आले आहेत.
काल त्यापैकी पाच बसेस दिवसभर बेळगाव -सौंदत्ती मार्गावर धावल्या. आज शुक्रवारी सौंदत्ती डोंगरावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार असल्यामुळे उर्वरित राखीव बसेस देखील भाविकांच्या सेवेसाठी तैनात असणार आहेत.