ब्लॅक फंगसने पत्नीचे निधन झाल्यामुळे खचलेल्या पतीने नैराश्येच्या भरात आपल्या पोटच्या चारही मुलींसह विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील बोरगल येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या सामूहिक आत्महत्येच्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गोपाळ हादीमनी (वय 46) त्याच्या मुली सोम्या (वय 19), स्वाती (वय 16), साक्षी (वय 12) आणि सैजन (वय 10) अशी विष प्राशन करून आत्महत्या केलेल्यांची नांवे आहेत.
माजी जवान असलेल्या गोपाळ याची पत्नी जया हिचे ब्लॅक फंगस रोगामुळे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर गोपाळ तीव्र दुःखी होऊन खचला होता. त्यामुळे नैराश्येच्या भरात त्याने आपल्या चार मुलींसह विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समजते.
तथापि पोलीस तपासाअंती या सामूहिक आत्महत्येमागील निश्चित कारण स्पष्ट होणार आहे. आत्महत्येच्या प्रकाराची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी तात्काळ बोरगाव गावाला धाव देऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच पाचही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हॉस्पिटलला धाडले. सदर घटनेची संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आपल्या शोक संदेशाद्वारे सामूहिक आत्महत्येच्या या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करून त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.
तसेच ब्लॅक फंगसमुळे डिप्रेशन अर्थात नैराश्येच्या भरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. नैराश्ये ही अतिशय धोकादायक बाब असून नागरिकांनी आपण नैराश्येच्या गर्तेत लोटले जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही मंत्री कारजोळ यांनी केले आहे.