बेळगाव जिल्ह्यातून विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार शहाजान डोंगरगाव (अथणी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्थानिक संस्थांच्या मतदारसंघातून माजी आमदार शहाजान डोंगरगाव यांनी चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.
याप्रसंगी जिल्हा मुख्य सचिव ॲड. एच. एस नसलापुरे, चिक्कोडी अल्पसंख्यांक घटकाचे अध्यक्ष गुलाब बागवान, राज्य उपाध्यक्ष ईशा नायकवाडी, हैदरअली पटेल, बाबूलाल बागवान, प्रदेश काँग्रेस संयोजक नियाज मुल्ला आदी उपस्थित होते. कर्नाटक विधान परिषद निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागले आहेत.
काँग्रेस पक्षांतर्गत निवड पारदर्शक व एकजुटीने व्हाव्यात यासाठी जिल्हास्तरीय प्रक्रिया सुरू आहे. यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. शिक्षक मतदारसंघ व पदवीधर मतदार संघाच्या येत्या जून 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपले अर्ज जिल्हा अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहेत.
त्यामध्ये शिवू एस, गुड्डापूर अथणी, चंद्रशेखर गुडसे हारुगेरी, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांचेही अर्ज आहेत. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीसाठी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला.
दरम्यान, आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यात एका जागेवरून काँग्रेस लढत देईल. जिल्ह्यात विधान परिषदेसाठी दोन जागा असल्या तरी एका जागेवरून लढणे पक्ष हिताचे ठरणार आहे. स्थानिक संस्थांवर आमचे वर्चस्व आहे. आतापर्यंत पाच ते सहा अर्ज आले असून विजयाची खात्री असलेल्या व्यक्तीला तिकीट देण्यात येईल, असे काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.