कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेऊन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नैसर्गिक आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत आगामी ईद-ए-मिलाद आणि महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक आणि सभा -समारंभावर प्रशासनाने बंदी घातली आहे.
यंदा ईद-ए-मिलाद आणि महर्षि वाल्मिकी जयंती हे दोन्ही सण येत्या 20 ऑक्टोबरला एकत्र आले आहेत. मुस्लिम बांधवांकडून मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद-ए-मिलाद म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त सामूहिक प्रार्थनेसह मिरवणूक काढली जाते. त्याचप्रमाणे महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त देखील मिरवणूक निघते. मात्र राज्यात अद्यापही कोरोना संसर्ग असल्यामुळे तो नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी यंदा हे दोन्ही सण साधेपणाने साजरे करण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकारचे मुख्य सचिव तुषार गिरीनाथ यांनी तशा आशयाचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना बजावला आहे.
ईद-ए-मिलाद सणानिमित्त मोहल्ल्यांमध्ये सकाळी आणि रात्री कोणत्याही प्रकारचे प्रवचन, सांस्कृतीक कार्यक्रम, सभा -समारंभ आयोजित करताना त्यात केवळ 100 जणांच्या सहभागाला परवानगी असेल. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी फेसमास्क लावण्यासह सामाजिक अंतराचा नियम पाळावा लागेल. दर्गा आणि मशिदीमध्ये प्रार्थनेच्या वेळी सामाजिक अंतर राखले जावे. त्याचप्रमाणे खुले मैदान, स्मशानभूमीत तसेच सभागृहात अधिक संख्येने प्रार्थना आयोजित करता येणार नाही.
60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनी घरातूनच प्रार्थना करावी. ध्वनिक्षेपक, डिजिटल साऊंड सिस्टिमचा वापर यावर देखील निर्बंध असणार आहेत. महर्षी वाल्मिकी जयंती यंदा साधेपणाने साजरी करावी लागणार असून मिरवणूक काढता येणार नाही. जयंतीनिमित्त आयोजित धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात केवळ 100 जणांनाच परवानगी असणार आहे.