दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती समिती बरखास्त करा म्हणणारे खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील आणि आम्हाला अनधिकृत म्हणणारे दिगंबर पाटीलच फुटीर असे म्हणणारे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी हे दोघेही बेळगाव न्यायालय आवारात एकमेकांच्या शेजारी काही वेळ एकाच कट्ट्यावर बसून होते. त्यांच्यात चांगलीच चर्चाही झाली.
एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या या समिती नेत्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असेल अशी उत्सुकता हे दृश्य पाहणाऱ्यांना लागून राहिली होती.
निमित्त होते सीमाप्रश्नाच्या लढ्यातच घातल्या गेलेल्या एका खटल्याचे.न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी चतुर्थ न्यायालयात ही सुनावणी होती. जय महाराष्ट्र म्हटले म्हणून या दोन्ही नेत्यांवर हा खटला सुरू आहे. लढ्याची दिशा एक, तत्व सुद्धा एक आणि पूर्वी बऱ्याचदा लढे,आंदोलने या निमित्ताने एकत्र काम केलेले मात्र सध्या एकमेकांच्या वेगळ्या भूमिकेमुळे गाजणारे हे नेते कोर्टात एकत्र आले होते. त्यांच्यात चर्चा रंगू लागली तश्या त्यांच्याकडे पाहणाऱ्याच्या भुवया विस्फारल्या आणि हातातले मोबाईलही त्यांची छायाचित्रे घेण्यात गुंतले.
सर्व मतभेद मिटवून टाकूया आणि एकोप्याने लढाईत बळ वाढवूया अशी चर्चा या दोन नेत्यांत झाली असेल तर ते सीमाप्रश्नाच्या दृष्टीने भाग्योदय कारक आहेच.
अशीच चर्चा त्यांच्यात व्हावी आणि खानापूर समितीतील बेकी कायम ठेवून आपला फायदा करून घेण्याची स्वप्ने बघणाऱ्या संधीसाधूंना चपराक मिळावी अशीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त झाली आहे.