बेळगाव न्यायालय आवारात वकिलांवरील हल्ल्यासारखे गुन्हेगारी प्रकार रोखण्यासाठी आणि येथील गैरसोई दूर करण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी समस्त वकीलवर्गाकडून केली जात आहे.
बेळगाव न्यायालयीन आवारात गेल्या कित्येक वर्षापासून अनेक सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे वकीलवर्गाला दररोज अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असतो. या पार्श्वभूमीवर न्यायालय आवारात वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
अलीकडे न्यायालय आवारात गुंडगिरीचे प्रकारही होत असून वकिलावर हल्ले होत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच न्यायालय आवारात वावरणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी या ठिकाणी मोक्याच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत.
न्यायालय आवारात बँक आणि एटीएमसह पोस्ट कचेरीची व्यवस्था केली जावी. ज्यामुळे न्यायालयीन कामकाजाचा भाग असलेल्या आर्थिक व्यवहारासाठी वकील आणि त्यांच्या अशिलांना आवारा बाहेरील बँका आणि एटीएममध्ये धावपळ करावी लागणार नाही. पोस्ट कचेरीमुळे पत्रव्यवहार करणेदेखील सोयीचे होईल. न्यायालय आवारात सार्वजनिक स्वच्छतागृहाची सोय नाही. त्यामुळे वकिलांसह न्यायालयात येणाऱ्या लोकांची विशेष करून महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत असते. याचीही गांभीर्याने दखल घेतली जावी आणि या ठिकाणी स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची उभारणी करावी.
न्यायालय आवारातील पार्किंग समस्येचे अद्याप व्यवस्थित निवारण झालेले नाही. यासाठी पार्किंगच्या ठिकाणी चार-पाच सुरक्षा रक्षक नेमण्याच्या मागणी बरोबरच वकिलांनी भुयारी मार्गाचा पर्याय सुचविला आहे. न्यायालयासमोरील प्रमुख रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आला आहे. तथापि फारसा वापर होत नसल्यामुळे हा मार्ग धूळ खात पडलेला असतो. या भुयारी मार्गाच्या ठिकाणी पार्किंगची सोय केल्यास न्यायालय आवारातील पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निकालात निघेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालय आवारात उपरोक्त आवश्यक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वकील वर्गाकडून केली जात आहे. तसेच पेशाने वकील असलेले बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके याकामी नक्की पुढाकार घेतील, अशी अपेक्षाही वकिलांकडून व्यक्त केली जात आहे.