बुद्धिबळाचा खेळ बुद्धीला चालना देणारा आणि व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक आहे, असे बेळगावचे डीसीपी डॉ. विक्रम आमटे म्हणाले.
भाग्यनगर येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमी यांच्यावतीने आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या सहयोगाने आयोजित एक दिवशीय जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विक्रम आमटे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय राव, ज्ञानसागर स्कूलच्या मुख्याध्यापिका इंद्रायणी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता उडकेरी, गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीचे संचालक प्रशांत अणवेकर उपस्थित होते.
स्पर्धेत जय-पराजय हा असतोच. मात्र, स्पर्धकांनी पराजयाने खचून न जाता पराभवाचे अवलोकन करून झालेल्या चुका सुधाराव्यात आणि पुन्हा अथक परिश्रम घेऊन विजयासाठी प्रयत्न करावेत, असेही विक्रम आमटे म्हणाले.
प्रारंभी बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश भंडारी, उपाध्यक्ष दत्तात्रेय राव, सचिव गिरिश बाचीकर, संस्थापक सदस्य प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावरील सोंगटी सरकावून बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना दत्तात्रय राव यांनी, स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धा स्विस लिगमध्ये खेळविण्यात आल्या. स्पर्धेत 38 हून अधिक बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता. सामाजिक कार्यकर्ते राम सागेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता उडकेरी, श्रीराम सेना शहापूर विभाग प्रमुख संतोष उर्फ संजय आर. पोटे यांनी स्पर्धा पुरस्कृत केली होती.
स्पर्धेत अनिरुद्ध दासरी याने पहिला, अदिती कुलकर्णी हिने दुसरा तर रचना अनगोळकर हिने तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच विनायक कोळी, अक्षत शेटवाल, समय उपाध्ये, वैष्णवी वादीराज, साकेत मेळवंकी, शिवनागराज व अतुल कब्बे यांनी अनुक्रमे चौथा ते दहावा क्रमांक मिळविला.
आर्बिटर म्हणून सक्षम जाधव यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना डॉ. विक्रम आमटे यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाच्या सुरवातीला प्रशांत अणवेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे भेटवस्तू, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कुमारी रचना अनगोळकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत अणवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षता पाटील, महेश निट्टूरकर, सक्षम जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
Trending Now