कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे यंदाचा दसरा उत्सव मागील वर्षाप्रमाणेच सोने लुटण्याचा जाहीर कार्यक्रम न करता कोरोना मार्गदर्शक सूचीचे पालन करून साधेपणाने साजरा करावा, अशी सूचना मार्केट पोलीस स्थानकाचे एसीपी सदाशिव कट्टीमणी यांनी केली आहे.
येत्या दसरा उत्सवासंदर्भात मार्केट पोलिस स्थानकामध्ये बेळगाव शहर देवस्थान कमिटी, चव्हाट गल्ली देवदादा सासनकाठी कमिटी आणि शहरातील नवरात्रोत्सव साजरा करणारी मंडळे यांची बैठक काल शुक्रवारी पार पडली.
याप्रसंगी एसीपी सदाशिव कट्टीमणी बोलत होते. बैठकीच्या प्रारंभी प्रास्ताविकामध्ये सण-उत्सवांसंदर्भातील सरकारी नियम आणि आदेशाची माहिती देण्यात आली. बैठकीत आगामी दसरा उत्सवाबद्दल चर्चा करण्यात आली.
यावेळी कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने मागील वर्षाप्रमाणेच पारंपारिक पद्धतीला बाधा न पोचवता साधेपणाने दसरा उत्सव साजरा करण्यात यावा अशी सूचना एसीपी कट्टीमणी यांनी केली. त्याला उपस्थितांनी सहमती दर्शवली.
मागील वर्षाप्रमाणे यावेळी दसऱ्या दिवशी प्रमुख पालखी वगळता शहरातील उर्वरित सर्व पालख्या संबंधित देवस्थान परिसरातच फिरवल्या जाव्यात. ज्योती कॉलेज येथील सीमोल्लंघन मैदानाकडे जाणाऱ्या प्रमुख पालखीसोबत यावेळी 5 ऐवजी 10 जणांना परवानगी असेल. तथापि मागील वर्षाप्रमाणे सीमोल्लंघन मैदानावर सोने लुटण्याच्या सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध असेल, असे पोलीसअधिकारी सदाशिव कट्टीमणी यांनी स्पष्ट केले. तसेच सर्वांनी कोरोना संदर्भातील सरकारच्या मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीस खडेबाजार पोलीस स्थानकाचे अधीक्षक, मार्केट पोलीस स्थानकाचे पोलिस निरिक्षक मल्लीकार्जुन तुळशीगेरी, एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बजंत्री, कॅम्प पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी आदी पोलिस अधिकाऱ्यांसह शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण -पाटील, चव्हाट गल्ली देवदादा सासन काठी कमिटीचे सुनील जाधव, लक्ष्मण नाईक, श्रीनाथ पवार, राजकुमार खटावकर, विविध देवस्थान मंदिरांचे प्रतिनिधी आणि नवरात्र उत्सव मंडळांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.