सध्या सर्वत्र कोरोना लसीकरणाचे प्रस्त सुरू आहे .प्रत्येक जण आपल्याला लस मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. पहिला डोस झाला तर दुसरा डोस साठी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करण्यासाठी अनेकजण प्रयत्नात आहेत .अशा वेळी पहिला डोस झालेल्या काही जणांना तुमचा दुसरा डोस झाला असल्याचे प्रमाणपत्र अचानक मेसेजच्या माध्यमातून आल्याचे प्रकार घडत असून लसीकरण यंत्रणेचा गलथान कारभार डोकेदुखीचा ठरत आहे.
प्रमाणपत्र मिळाले ही समाधानाची बाब असली तरी लस न घेताच प्रमाणपत्र मिळू लागल्यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करू लागले आहेत. काही ठिकाणी प्रवास व इतर कारणांसाठी दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते .अशा वेळी हे प्रमाणपत्र वापरता येईल यात शंका नाही.
कारण बऱ्याचदा लस घेतली तरी प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे. नाव नोंदणीसाठी उशीर करणे, सर्वर डाऊन यासारखी कारणे दिली जातात अशा वेळी लस न घेताच प्रमाणपत्र आल्यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. प्रशासन आणि आरोग्य विभागाचा गलथान कारभार कारणीभूत ठरत असून त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.
लसीकरण न झालेल्यांना प्रमाणपत्रे कशी मिळाली त्याची चौकशी करून या संदर्भातील योग्य ती कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे त्यामुळे तुम्ही लस घेतली. अशी भूमिका जर आरोग्य विभागाने घेतली तर काहीजणांना फक्त एकाच डोसवर समाधान मानावे लागणार असून दुसरा डोस कसा घ्यायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. माझे लसीकरण झालेले नाही असे समजावून सांगण्याची वेळ काही जणांवर आली असून हे प्रमाणपत्र खोटे आहे असे सांगताना डोकेदुखी चा सामना करावा लागत आहे.
अशा वेळी काय करावे त्याचा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी आणि लसीकरणात गुंतलेल्या आरोग्य खात्याने करावा अशी मागणी होत आहे.