बेळगाव सीमावर्ती भागातील कोरोना निर्बंध शिथिल करावेत या जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या शिफारशीची दखल घेताना राज्याच्या सीमावर्ती भागातील कोरोना निर्बंध शिथील करण्यासंदर्भात दसरा सण संपल्यानंतर कोविड तज्ञ समितीशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळूर येथील विमानतळावर आज बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कर्नाटकाला लागून असलेल्या केरळ व महाराष्ट्र राज्यातील कोरोना महामारीचा तज्ञांकडून आढावा घेतला जात आहे.
दसरा संपल्यानंतर सरकार कोविड तज्ञांची बैठक घेणार आहे. या बैठकीत राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सध्या लादलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. त्याप्रमाणे प्राथमिक शाळांचे वर्ग भरविण्यासंदर्भातही याच बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्याला संबंधितांची मान्यता मिळताच लसीकरण सुरू केले जाईल. लसीकरणात कर्नाटक संपूर्ण देशात आघाडीवर आहे असे सांगून कोरोनासंदर्भात लोकांवर गुन्हे नोंदवून आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरी या संदर्भात पोलिस अधिकार्यांशी चर्चा करून गुन्हे मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले. समाजात लोकांच्या भावना दुखावून चालत नाही.
सामाजिक सौहार्द राखण्यास आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले. बेळगाव सीमावर्ती भागातमध्ये कोरोना नियंत्रणाखाली आल्यामुळे येथील निर्बंध शिथिल करावेत अशी शिफारस जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील प्रमाणे स्पष्टीकरण दिले.