बेळगाव शहरातील स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यात बाबतचा रस्ता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला प्रशासकांची किंवा लोकनियुक्त सभागृहाची मंजुरी मिळताच ही योजना तातडीने कार्यान्वित केली जाणार आहे.
मोफत अंत्यसंस्काराच्या या योजनेसाठी 2021 -22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तब्बल 50 लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्या निधीचा विनियोग चालू आर्थिक वर्षातच व्हावा यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे. या योजनेसाठी आवश्यक गोवऱ्यांची उपलब्धता कशी केली जावी याची चाचपणी ही आरोग्य विभागाकडून सुरू आहे.
शहरातील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार करण्याबाबतच्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावास प्रशासकांची किंवा लोकनियुक्त सभागृहाची मंजुरी मिळाल्यास बेळगावात पहिल्यांदाच मोफत अंत्यसंस्कार सुविधा सुरू होणार आहे.
गेल्या मार्च महिन्यात प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी बैठक न घेताच महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. तो अर्थसंकल्प शासनाकडूनही मंजूर झाला असून आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासन पुढे आले आहे. बेळगावात महापालिकेच्या मालकीच्या स्मशानभूमींची संख्या जास्त आहे. तथापि पहिल्या टप्प्यात सदाशिवनगर व शहापूर या दोन स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्काराची योजना राबविली जाणार आहे.