राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सीआयएसएफतर्फे काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला आज गुरुवारी सकाळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी हिरवा बावटा दाखवून चालना दिली.
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सीआयएसएफतर्फे दीर्घ अंतराच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भुईकोट किल्ला नजीकच्या सम्राट अशोक चौक येथे आज सकाळी प्रमुख पाहुण्या खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि पोलिस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन यांनी हिरवा बावटा दाखवून या सायकल रॅलीला चालना दिली.
तत्पूर्वी प्रमुख पाहुण्यांचा सायकल रॅलीत सहभागी झालेल्या सीआयएसएफच्या सायकलपटू जवानांशी परिचय करून देण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डाॅ. विक्रम आमटे (कायदा-सुव्यवस्था) पोलीस उपायुक्त व्ही. व्ही. स्नेहा (गुन्हे -रहदारी), सीआयएसएफ वरिष्ठ अधिकारी व्ही. एस. प्रतीहार यांच्यासह पोलीस आणि सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बेळगावातून निघालेली सदर सायकल रॅली 115 कि. मी. अंतराचा प्रवास करून कोल्हापूर येथे विश्रांतीसाठी थांबणार आहे. या ठिकाणी या रॅलीचा 1,250 कि. मी. अंतराचा प्रवास पूर्ण झालेला असेल. सदर सायकल रॅलीचा शुभारंभ गेल्या 29 सप्टेंबर 2021 रोजी तिरुवनंथपुरम येथून झाला होता.
आता केवाडिया गुजरात येथील सरदार वल्लभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे येत्या 31 ऑक्टोबर 2021 रोजी पोहोचणारी सदर सायकल रॅली त्या ठिकाणी पटेल यांच्या जयंती दिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय एकता दिवस समारंभात सहभागी होऊन पुढील प्रवासाला निघेल.