रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव -शेडबाळ -बेळगाव दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे येत्या शनिवार दि. 16 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. या पद्धतीने गेल्या दीड महिन्यात ही रेल्वेसेवा चौथ्यांदा रद्द झाली आहे.
बेळगाव ते शेडबाळ दरम्यान धावणारी ही पॅसेंजर रेल्वे गेल्या 30 ऑगस्टपासून बंद होती. त्यानंतर 13 सप्टेंबरला ती पुनश्च सुरू करण्यात आली होती. परंतु पुन्हा पत्रक काढून 13 ते 16 सप्टेंबरपर्यंत ही पॅसेंजर रद्द करण्यात आली होती.
पुढे पॅसेंजर सुरू करण्यात आली, मात्र पुन्हा कामात अडथळा येत असल्याने 29 पासून 12 ऑक्टोंबरपर्यंत ही पॅसेंजर बंद ठेवण्यात आली होती.
सदर पॅसेंजर रेल्वे सेवा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन देणाऱ्या नैऋत्य रेल्वेने आता पुन्हा 16 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा बंद असल्याचे एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
सध्या या मार्गावर धावणारी ही एकमेव पॅसेंजर रेल्वे होती, ती देखील आता बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.