बेळगाव शहरातील समस्त नागरिकांनी ‘सेवा सिंधू’ सुविधेच्या माध्यमातून जन्म-मृत्यूचे दाखले मिळवावेत असे बेळगाव महापालिकेला वाटत असून येत्या 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत याची रंगीत तालीम घेतली जाणार आहे.
यासाठी सदर कालावधीत म्हणजेच दहा दिवस महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखले वितरण विभागाचे काम बंद ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या काळात सेवा सिंधू सुविधेच्या माध्यमातून दाखले घेण्याचे आवाहन केले जाणार आहे.
भविष्यात महापालिकेतून होणारे जन्म -मृत्यू दाखले वितरणाचे काम कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय विचाराधीन आहे. केवळ दाखल्यांमध्ये दुरुस्ती, जन्म किंवा मृत्यू नोंद नसल्याबाबतचे माहिती देणे ही कामे आरोग्य विभागाकडून होतील.
त्यामुळे जन्म व मृत्यू दाखल्यासाठी ‘सेवा सिंधू’ हा एकमेव पर्याय उपलब्ध असेल जन्म व मृत्यू नोंदीबाबतची जुनी माहिती ई -जन्म या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे गेल्या 25 ते 30 वर्षात महापालिकेकडे सुमारे दोन लाख नागरिकांच्या जन्म व मृत्यूची नोंद झाली आहे याची माहिती ई -जन्म पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.
महापालिकेच्या जन्म व मृत्यू दाखले विभागातील कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. तथापी दैनंदिन कामकाजासोबत ते काम करता येत नाही असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यासाठी 10 दिवस जन्म व मृत्यू दाखले वितरणाचे काम बंद ठेवले जाणार आहे.
या दहा दिवसांच्या कालावधीत नांवे अपलोड करण्याचे काम पूर्ण केले जाईल, शिवाय जन्म व मृत्यू नोंद माहिती एकदा का पोर्टलवर अपलोड झाली की मग त्यानंतर जुने जन्म व मृत्यू दाखलेही सेवा सिंधूच्या माध्यमातून मिळणे शक्य होणार आहे.
महापालिकेने सेवा सिंधू सुविधा उपलब्ध करून दिली असून शहरातील कोण कोणत्या केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे त्याची माहिती देखील जन्म व मृत्यू दाखले विभागाने प्रसिद्ध केली आहे. शहरातील अनेक हॉस्पिटल्समध्ये जन्म व मृत्यू नोंद थेट ऑनलाइन केली जात आहे. त्यामुळे दाखल यांमधील चुका घटल्या आहेत हे विशेष होय.