वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यासाठी प्रशासनाने शहराच्या प्रत्येक भागात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित ठिकाणी ‘नो पार्किंग’ प्रमाणे ‘पार्क हिअर’ फलक अथवा निशान लावावे, अशी मागणी शहरातील बीएसएन रेजिमेंटने केली आहे.
बेळगाव पोलीस आणि सध्या नो पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोहीम उघडली आहे. नो पार्किंग जागेत वाहने पार्क करणाऱ्या दुचाकी चालकाकडून 1650 रुपये तर चारचाकी वाहन चालकाकडून 2150 रुपये दंड वसूल केला जात आहे.
रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्याकडून जरूर दंड आकारला जावा. मात्र प्रशासनाला आमची विनंती आहे की शहरात प्रथम लोकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाव्यात.
त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने नो पार्किंगचे निशान सर्वत्र लावले जाते, त्या पद्धतीने ‘पार्क हिअर’ अर्थात येथे पार्किंग करा हे दर्शविणारे निशान देखील सर्वत्र लावण्यात यावे. यामुळे वाहनचालकांची विशेष करून ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय होणार आहे, असे बीएसएन रेजिमेंटने स्पष्ट केले आहे.
रहदारी पोलिसांनी टोचनचा वापर करत दंड आकारण्याची मोहीम जोरदार हाती घेतली आहे अनेक ठिकाणी जिथं नो पार्किंग असा फलक लावलेला नसतो त्या ठिकाणाहून देखील वाहनांची टोचन उचल होत आहे त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे आधी पार्किंग आणि नो पार्किंग झोन जाहीर करा मगच टोचन कारवाई करा अशीही मागणी वाढू लागली आहे.